हळदीला ‘सुवर्ण काळ’! वसमतच्या बिटात २० हजारांवर भाव मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंदोत्सव
By विजय पाटील | Published: July 19, 2023 07:32 PM2023-07-19T19:32:12+5:302023-07-19T19:32:33+5:30
कृऊबा बाजार समिती मोंढ्यात ७ हजार कट्ट्यांची आवक
वसमत (जि. हिंगोली): कृऊबा बाजार समिती मोंढ्यात बुधवारी ७ हजार कट्ट्यांची आवक झाली. त्यानंतर बोली बिटात ९ हजार ते २० हजार ५ रुपयांपर्यंत हळदीला दर मिळाला. यापूर्वीही कुरुंद्याच्या मोंढ्यात हळद १९ हजार १ रुपयांवर पोहोचली होती. हळदीचे दररोज दर वाढत असल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे. जुलै महिन्यात हळदीला ‘सुवर्ण काळ’ आला आहे.
१९ जुलै रोजी मोंढ्यात हळदीच्या ७ हजार कट्ट्यांची आवक झाली. हळदीचे बिट झाले आणि बिटात दर्जेदार हळदीस १५ हजार ते २० हजार ५ रुपयांचा दर मिळाला. शेतकरी प्रकाश फेगडे (रा. रेऊलगाव) येथील शेतकऱ्यांच्या १६ क्विंटल हळदीस सर्वच २० हजार ५ दर मिळाला आहे. तर अन्य शेतकऱ्यांच्या हळदीस ९ हजार ५०० रुपयांपासून १५ हजारापर्यंत दर मिळाला आहे.
यापूर्वीही १९ हजार १ रुपयांपर्यत हळदीस दर मिळाला होता. १४ वर्षापूर्वी हळदीचे दर १८ हजार प्रति क्विंटल वर गेले होते. जुलै महिन्यात हळदीचे दर वाढत आहेत. ११ हजार ते १५ हजारांचे दर दररोज होत असलेल्या बिटात मिळत आहेत. वसमत येथील मोंढ्यात नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांतील हळद विक्रीसाठी येत आहे.
मोंढ्यात हळद विक्री करा...
कृऊबाच्या मोंढ्यात शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य दर मिळत आहे. १९ जुलै रोजी हळद २० हजारांवर पोहोचली आहे. शेतकऱ्यांनी शेती माल मोंढ्यात विक्री करावा.
- तानाजी बेंडे, सभापती कृऊबा, वसमत
हळदीला मिळत असलेला भाव चांगला....
हळदीच्या दरात उच्चांकी येईल असा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मोंढ्यात २९ कट्टे हळद विक्रीसाठी आणली होती. बिटात सर्वाधिक २० हजार ५ रुपयांचा दर हळदीस मिळला आहे. सर्वाधिक दर मिळेल असे वाटले नव्हते.
- प्रकाश फेगडे, शेतकरी, रेऊलगाव