हळदीला भाववाढीची चमक; हिंगोली मार्केट यार्डात ३२०० क्विंटलची आवक
By रमेश वाबळे | Published: January 29, 2024 07:01 PM2024-01-29T19:01:00+5:302024-01-29T19:02:53+5:30
सोयाबीनची घसरगुंडी सुरूच; तुरीला समाधानकारक भाव मात्र उत्पादन निम्म्याखाली
हिंगोली : येथील मार्केट यार्डात सरासरी दहा हजारांवर पोहोचलेल्या हळदीला २९ जानेवारी रोजी भाववाढीची चमक मिळाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे जवळपास एक ते दीड हजाराने भाववाढ झाली. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सोयाबीनच्या दरात मात्र सुरू असलेल्या घसरगुंडीमुळे शेतकऱ्यांत निराशा पसरली आहे, तर तुरीलाही यंदा समाधानकारक भाव आहे. मात्र, उत्पादन नसल्याने भाववाढीचा फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हिंगोली बाजार समितीच्या मार्केट यार्डात ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान हळदीने १५ हजारांचा पल्ला गाठला होता. मागील काही वर्षांतून उच्चांकी भाव मिळाल्याने मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांनी मार्केट यार्डात हळद विक्री केली. परंतु, आणखी भाववाढ होईल अशी आशा असलेल्या शेतकऱ्यांनी हळद विक्रीविना ठेवली. परंतु, भाव वाढण्याऐवजी घसरण सुरू झाली. ऑक्टोबरच्या शेवटी घसरलेले भाव नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कायम होते. पडत्या भावामुळे मार्केट यार्डातील आवक मंदावली होती. जवळपास एक हजाराच्या खाली आवक होत असताना २४ जानेवारी रोजी एक ते दीड हजाराने दर वधारले, तर २९ जानेवारी रोजीही कमाल ११ हजार ते किमान १३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलने हळदीची विक्री झाली. भावात वाढ झाल्याने आवकही वाढली असून, या दिवशी ३ हजार २०० क्विंटलची आवक झाली होती.
तर, यंदा सोयाबीनची परिस्थिती वाईट असून, शेतकऱ्यांना पडत्या भावात विक्री करावी लागत आहे. तुरीला समाधानकारक भाव मिळत असला तरी उत्पादनात प्रचंड घट झाल्याने शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तूर शिल्लक नसल्याचे चित्र आहे.
सोयाबीनची घसरगुंडी; उत्पादक रडकुंडी...
मागील दोन वर्षांपासून सोयाबीनला समाधानकारक दर मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी पडत्या भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले होते. परंतु, वर्षभरही भाव वाढला नाही. यंदाचे नवीन सोयाबीन आल्यावर तरी भाव वाढतील, अशी आशा होती. मात्र, भाव वाढण्याऐवजी घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांना जुने आणि नवे सोयाबीन पडत्या दरात विक्री करावे लागले. यातून अनेक शेतकऱ्यांना लागवडही वसूल झाला नाही. आता ज्या शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन विक्रीविना ठेवले, परंतु भाव वाढण्याऐवजी घसरल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.
तुरीला भाव; पण शेतकऱ्यांना लाभ नाही...
यंदा तुरीला दहा हजारांवर भाव मिळत आहे. परंतु, पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव आणि अवकाळीच्या फटक्यामुळे उत्पादन निम्म्याखाली आले. काही शेतकऱ्यांना तर यंदा तुरीची काढणीही परवडली नाही. त्यामुळे बाजारात भाव जरी समाधानकारक मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तूर नाही. त्यामुळे या भाववाढीचा लाभ होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.