४४० शिक्षकांचा दर्जोन्नतीस होकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:02 AM2018-11-21T01:02:41+5:302018-11-21T01:03:50+5:30
आरटीईत उच्च प्राथमिक स्तरावर विज्ञान, गणित-भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषय संवर्गातील प्राथमिक शिक्षकांना दर्जोन्नती देणे आवश्यक होते.
हिंगोली : मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेली विषय शिक्षक समुपदेशन पदस्थापना प्रक्रिया अखेर मंगळवारी पूर्ण झाली. आरटीईत उच्च प्राथमिक स्तरावर विज्ञान, गणित-भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषय संवर्गातील प्राथमिक शिक्षकांना दर्जोन्नती देणे आवश्यक होते. अखेर ४४० शिक्षकांना १९ व २० नोव्हेंबर रोजी समुपदेशानाने पदस्थापना देण्यात आली.
२०१४ पासून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या जागा भरता येत नव्हत्या. आॅनलाईन बदल्यांमध्ये याच कारणाने अनेक प्राथमिक शिक्षक विस्थापित होऊन विषय शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागेवर रॅन्डम राऊंडद्वारे पदस्थापित झालेले होते. न्यायालयात प्रकरण असल्याने जि.प. हिंगोलीशिक्षण विभागांतर्गत तांत्रिक अडचण निर्माण होवून शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली होती. अशा परिस्थितीमध्ये न्यायालयीन याचिका मागे घेणे व त्यानंतर विषय शिक्षकांना पदस्थापना देण्याची प्रक्रिया करणे क्रमप्राप्त होते. ही याचिका करणारे ३२ शिक्षकांना महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने रामदास कावरखे यांनी प्रयत्न केल्याने संबंधितांनी विनाअट काढून घेतली. त्यानंतर विषयावर पदवी असलेलया शिक्षकांचे होकार घेवून सेवाज्येष्ठता याद्या तयार केल्या. सदर याद्या प्रकाशित करून १९ व २० नोव्हेंबर रोजी रॅन्डम राऊंडमधील पदस्थापित शिक्षकांना त्यांच्या शाळेवरील रिक्त असलेल्या जागीच होकार असल्यास पदस्थापना देण्यात आली. नकार असल्यास त्यांना अतिरिक्त शिक्षक म्हणून प्राथमिक शिक्षकांच्या जागेवर जाण्यास पात्र ठरवले. त्यानंतर उर्वरित सर्व पदे प्रोजेक्टरद्वारे समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आल्या. पदस्थापनेमुळे ग्रामीण भागातील शाळेवर पदवीप्राप्त शिक्षकांच्या नेमणुकीमुळे शाळेचा शैक्षणिक स्तर व दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
२३0 जागा रिक्त : आणखी एक टप्पा
- जिल्ह्यात रिक्त असलेल्या ६७२ पदविधर पदांपैकी ४४० जागा भरल्याने २३० जागा रिक्त आहेत. पुढील टप्प्यामध्ये या जागा भरण्याची कार्यवाही शिक्षण विभागाकडून पूर्ण होईल असे सांगण्यात आले. सदर प्रक्रिया जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, शिक्षण सभापती संजय देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, पशुसंवर्धन अधिकारी प्रवीण घुले तसेच संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पार पाडली.
- जिल्हा परिषदेत काही शिक्षकांनी पदोन्नती तर घेतली. मात्र तरीही नाराजीचा सूर होता. तर काहींना जे झाले ते बरे झाले, असे वाटत होते. नाराजांची पदाधिकाºयांकडे रेलचेल दिसून येत होती.