सर्पमित्रांनी पकडले एकाच दिवसात बारा साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:57+5:302021-06-17T04:20:57+5:30
हिंगोली : पावसाळ्याचे दिवस आणि वातावरणातील बदलामुळे साप बाहेर येऊ लागले आहेत. मंगळवारी शहरातील ६ नगरांमध्ये सर्पमित्रांनी १२ साप ...
हिंगोली : पावसाळ्याचे दिवस आणि वातावरणातील बदलामुळे साप बाहेर येऊ लागले आहेत. मंगळवारी शहरातील ६ नगरांमध्ये सर्पमित्रांनी १२ साप पकडून वन विभागाकडे सुपूर्द केले.
दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, पाऊसही चांगला पडत आहे. गर्मी जास्त प्रमाणात झाल्यामुळे साप बिळातून बाहेर येऊ लागले आहेत. १५ जून रोजी शहरातील ६ नगरांमधून सर्पमित्रांना कॉल येताच सर्पमित्रांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या नगरांकडे धाव घेतली. शहरातील यशवंतनगर येथे २ मणियार, १ दिवड, आदर्श महाविद्यालय परिसर १ धामण, १ मणियार, सावरकरनगर २ दिवड, सरस्वतीनगर २ दिवड, नारायणनगर १ दिवड, विद्यानगर १ दिवड, १ कुकरी असे साप पकडले. या पकडलेल्या सापांबाबत वन विभागाला कळविले असून, त्यांच्या सल्ल्यानुसार साप जंगलात नेवून सोडण्यात येणार असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.
सापांना मारू नये...
पावसाळ्याचे दिवस असल्याने साप बाहेर येणे साहजिक आहे. तेव्हा नागरिकांनी लहान - मोठ्या सापांना मारू नये. लगेच सर्पमित्रांना किंवा वन विभागाला कळवावे, असे आवाहन सर्पमित्र मुरलीधर कल्याणकर, ओम जाधव यांनी केले आहे. फाेटाे आहे.