१० लाखांची खंडणी प्रकरणात ट्विस्ट, ज्याचे अपहरण झाले तोच निघाला मास्टरमाइंड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 01:59 PM2024-03-13T13:59:46+5:302024-03-13T14:01:27+5:30
दोन दिवसांची पोलिस कोठडी; पोलिसांची माहिती
हिंगोली : मैत्रिणीला बोलत असल्याने एकाचे अपहरण करून दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी ११ मार्च रोजी पकडले होते. आता यात नवा ट्विस्ट आला असून, ज्याचे अपहरण झाले, त्याचाही यात सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील विनोद शेषराव पांडे यांचे काही जणांनी अपहरण करून त्यांचे भाऊ प्रमोद पांडे यांच्याकडे १० लाखांची खंडणी मागितली होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, राजेश मलपिलू, हिंगोली ग्रामीणचे विजय रामोड, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांची पथके शोधासाठी रवाना झाली.
शेतकऱ्यांची वेशभूषा करीत डमी १० लाखांची बॅग तयार करून खंडणीखोरांच्या ताब्यातून विनोद पांडे यांची सुटका पोलिसांनी केली. तसेच ओमकार उर्फ शूटर केशव मुखमाहाले, हनुमान उर्फ हंटर विश्वनाथ कऱ्हाळे, नितीन उर्फ जादू रामेश्वर कऱ्हाळे (सर्व रा. डिग्रस कऱ्हाळे) यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. यात ज्याचे अपहरण झाले, त्या विनोद पांडे याचाही अपहरण नाट्यात सहभाग असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्यालाही अटक केली. आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याचेही पोलिसांनी सांगितले.