नकली नोटा छपाईचे 'वर्क फ्रॉम होम' जोरात; हिंगोलीत २४ लाखाच्या मुद्देमालासह दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 12:15 PM2020-09-03T12:15:45+5:302020-09-03T12:26:40+5:30
हिंगोलीतील आनंद नगर येथील घरावर ग्रामीण पोलिसांची धाड
हिंगोली : ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर येथे भाड्याने घेतलेल्या घरातील एका खोलीत पोलिसांनी २ सप्टेंबर रोजी धाड टाकून १७ लाख ४७ हजार ३५० रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या. याप्रकरणी दोन आरोपीं अटकेत असून पोलिसांनी २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आनंद नगर भागातील अरूण हनवते यांच्या घरात भाड्याने वास्तव्यास असलेला एक इसम त्याची महिला साथीदार बनावट नोटा छापून त्या बाजारात चलनात आणत आहेत, अशी गोपनिय माहिती मिळाल्यावरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने २ सप्टेंबर रोजी सापळा रचून नमूद ठिकाणी धाड टाकली. यावेळी १००, २००, ५०० आणि २००० रुपये किमतीच्या नकली नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, पिवळसर धातुच्या महालक्ष्मी देवीच्या १३ मुर्ती तसेच बनावट १७ लाख ४७ हजार ३५० रुपये, प्रिंटर, चारचाकी वाहन असा एकूण २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
लॉकडाऊन काळात सुरु केली छपाई
याप्रकरणी आरोपी संतोष जगदेवराव सुर्यवंशी (देशमुख) आणि छायाबाई गुलाबराव भुक्तार यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भादंविचे कलम ४८९ (अ),(ब),(क),(ड),(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात जून २०२० पासून त्यांनी भाड्याचे घर घेऊन नकली नोटा छापणे सुरु केले. नकली नोटा छापून त्या बाजारपेठेत आणणे यामध्ये मोठी साखळी असण्याची शक्यता असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने यांनी दिली आहे.