येहळेगाव तु.गटात दोन उमेदवारांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:35 AM2019-06-07T00:35:07+5:302019-06-07T00:35:23+5:30
तालुक्यातील येहळेगाव तु. या गटासाठी पोट निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत दोन नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. .
कळमनुरी : तालुक्यातील येहळेगाव तु. या गटासाठी पोट निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत दोन नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. .
या गटातील जि.प. सदस्या बायनाबाई खुडे यांचे निधन झाल्याने येथील जागा रिक्त होती. आतापर्यंत सेनेकडून छायाबाई शेळके व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून शिवनंदा खुडे हे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ८ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. २३ जून रोजी मतदान व २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. येथील जागा एस.टी. (अनुसूचित जमाती) महिलेसाठी राखीव आहे. १० जून रोजी उमेदवारी अर्जाची छाननी तर १५ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेतल्या जाणार आहे. या येहळेगाव तु. गटात कसबे धावंडा, येहळेगाव तु., बेलथर, जरोडा, कामठा, साळवा, येलकी, बेलमंडळ, नरवाडी, घोडा, येगाव ही ११ गावे येतात. या गटात पुरूष मतदार ७८३७, महिला मतदार ७१७२ एकूण १५ हजार ९ मतदार आहेत.
ही जागा आधी काँग्रेसकडे होती. ती खेचण्यासाठी शिवसेना जोर लावताना दिसत आहे. मात्र ही जागा काँग्रेसकडेच राहण्यासाठी आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. या जागेच्या जय-पराजयावर जि.प.तील आगामी समीकरणे अवलंबून आहेत. ही जागा काँग्रेसने राखली तर जि.प.तील सत्ता समिकरणात सहभागी होण्याची संधी राहणार आहे. सध्या शिवसेनेला अध्यक्षपद देऊन राकाँ व काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. मात्र ही जागा गमावली आणि आगामी काळात सेना व भाजपने गळ्यात गळा घातल्यास एका अपक्षाच्या मदतीने त्यांना सत्तेत येणे फारसे अवघड राहणार नाही. तर सध्या जि.प.त शिवसेना-१५, राष्ट्रवादी-१२, काँग्रेस-११, भाजप-१0 व तीन अपक्ष असे संख्याबळ आहे. २७ चा आकडा जुळविताना सेना किंवा भाजप दोन्हीच्याही मदतीची गरज न पडण्यासाठी ही जागा हाती येणे गरजेचे आहे. तशी सत्ता स्थापनेत आघाडी व युतीचा धर्म पाळला गेला तर दोघांनाही समान संधी राहणार आहे. त्यावेळीही युतीला एकाऐवजी दोन अपक्ष लागतील. त्यामुळे या जागेसाठी दोन्हीकडूनही नेतेमंडळी जिवाचे रान करणार, हे निश्चित आहे.
पंचायत समितीसाठी एक अर्ज दाखल
औंढा नागनाथ : तालुक्यात होत सहापैकी ५ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीच्या जागेसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाले. गुरुवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे माथा, हिवरा जटू, देवळा तर्फे लाख, पुरजळ, पूर या ग्रामपंचायतसाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल आल्याने बिनविरोध झल्यात जमा आहे. तर बेरुळा येथे अर्ज न आल्याने जागा रिक्त राहणार आहे. तर पंचायत समितीच्या असोला तर्फे लाख या गणासाठी गुरुवारी एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केला असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार सचिन जोशी यांनी दिली आहे.
हिंगोली न.प.साठी सात अर्ज दाखल
हिंगोली नगरपालिकेच्या प्रभाग ११ बच्या पोटनिवडणुकीसाठीही अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांचे सात अर्ज दाखल झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह शिवसेना व भाजपच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आघाडी दिसत असली तरीही युती होणार की नाही, यावरून सध्या तरी पेच निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अश्विनी माधव बांगर, सेनेकडून सविता अतुल जैस्वाल, भाजपकडून गीता किरणकुमार लाहोटी, अपक्ष पठाण मलेका पठाण सत्तार, सादेकाबी शे.रफिक यांनी अर्ज दाखल केले आहेत. लाहोटी व बांगर यांनी एकेक अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केला.
निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे पीठासीन अधिकारी तर रामदास पाटील सहायक आहेत. या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही भेट दिली.
पूर्वीच्या नगरसेविका लता नाईक यांनी अनपेक्षितपणे निवडणुकीतून माघार घेतल्याने सेनेने जैस्वाल यांना मैदानात उतरविले. तर आघाडीची उमेदवारी दाखल करण्यासाठी जमलेली नेतेमंडळीही उमेदवारीवरून एकमेकांशी वाद घालत असल्याचे चित्र न.प.त होते. नंतर एकत्रित अर्ज दाखल केला.
नाईक यांची माघार, राष्ट्रवादीतील वाद आणि भाजपची उमेदवारी या तिन्ही बाबींमुळे निवडणुकीची एकच चर्चा रंगली होती.