‘त्या’ दोन मुलांचे अपहरण झालेच नव्हते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:57 PM2018-12-28T23:57:55+5:302018-12-28T23:58:04+5:30
शहरातील कमलानगर येथून बेपत्ता झालेली दोन मुले पुणे येथे सापडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे हिंगोली येथून पोलिसांचे पथक नातेवाईकांसह पुण्याला गेले. दोन्ही मुले पुणे येथील बालगृहात होते. २८ डिसेंबर रोजी दोन्ही मुलांना पोलिसांनी नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या दोन्ही मुलांनी आम्ही स्त:हूनच ट्रेनने पुण्याला गेलो, असे पोलिसांना सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील कमलानगर येथून बेपत्ता झालेली दोन मुले पुणे येथे सापडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे हिंगोली येथून पोलिसांचे पथक नातेवाईकांसह पुण्याला गेले. दोन्ही मुले पुणे येथील बालगृहात होते. २८ डिसेंबर रोजी दोन्ही मुलांना पोलिसांनी नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या दोन्ही मुलांनी आम्ही स्त:हूनच ट्रेनने पुण्याला गेलो, असे पोलिसांना सांगितले.
हिंगोली तालुक्यातील भिंगी येथील भानुदास सोनाजी बुक्कन यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की हिंगोली शहरातील कमलानगर येथील अनाथ मुलांच्या बालगृहातून त्यांचा मुलगा व त्याच्या मित्राचे कोणीतरी अपहरण केले. त्यामुळे याप्रकरणी बालकांचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. तसेच विविध पोलीस ठाण्यात दोन मुले मिसिंगची माहिती व त्यांचे फोटोही पाठविले होते. २५ डिसेंबर रोजी ही दोन्ही मुले पुणे येथील रेल्वेस्थानक परिसरात फिरत असताना तेथील पोलिसांना आढळून आली. त्यांनी हिंगोली येथील पोलिसांना मुले सापडल्याची माहिती दिली. हिंगोली येथीलच मुले आहेत, याबाबत खात्री केली त्यानंतर पोलिस पथक व मुलांचे पालक पुण्यात पोहचले. तेथील बालगृहातून मुलांना हिंगोली येथे आणण्यात आले. २८ डिसेंबर रोजी दोन्ही मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी पोउपनि गोहाडे, बालकल्याण समिती सदस्या प्रा. जया करडेकर, प्रा. विक्रम जावळे, अधीक्षक परमिता कांबळे, अनिल शिंदे आदींनी महत्त्वाची भुमिका बजावली. दोघा मुलांचा शोध लागल्याने त्यांचे अपहरण झाले नव्हते हे स्पष्ट झाले. मुले सापडल्याने त्यांच्या पालकांना आनंद झाला.