सात वर्षांपासून शहरात दोन दिवसांआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:32 AM2021-04-28T04:32:11+5:302021-04-28T04:32:11+5:30
हिंगोली: पावसाचे प्रमाण कधी जास्त असते, तर कधी कमी असते. त्यामुळे गत सात वर्षांपासून शहरात दोन दिवसाआड पाणी सोडण्याचा ...
हिंगोली: पावसाचे प्रमाण कधी जास्त असते, तर कधी कमी असते. त्यामुळे गत सात वर्षांपासून शहरात दोन दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला. या वर्षीही उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी पाणी जपूनच वापरावे, असे आवाहन आवाहनही नगरपरिषदेने केले आहे.
सद्यस्थितीत शहरात १२ हजार नळ कनेक्शन आहेत. भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून नगरपरिषदेने दोन दिवसाआड पाणी नळांना सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सद्यस्थितीत एक तास पाणी सोडत आहोत, परंतु काही नागरिकांनी नळांना पाणी दीड ते दोन तास सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती, पण ते शक्य होत नाही. कारण बहुतांश ठिकाणी कित्येक वेळा पाणी वाया जाते. सण, उत्सव असेल, तेव्हा नागरिकांनी मागणी नाही केली, तरी पाणी १५ ते २० मिनिटे जास्तच सोडले जाते.
आजमितीस शहरात ९ पाण्याच्या टाक्या आहेत. यामध्ये फलटन येथे १ (१८ लाख लीटर पाणी बसते), अजयनगर येथे १ (१५.५ लाख लीटर), खटकाळी बायपास येथे १ (५.५ लाख लीटर), गारमाळ येथे १ (१.५ लाख लीटर), नेहरूनगर येथे १ (९ लाख लीटर), मंगळवारा येथे २ (९ लाख लीटर, ११ लाख लीटर), आदर्श महाविद्यालय येथे २ पाण्याच्या टाक्या असून, त्यात ९-९ लाख लीटर पाणी साठविले जाते.
लिंबाळा येथे स्टोरेज टाकी
औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातून पाणी डिग्रस कराळे येथे येते. त्यानंतर, पाणी तेथे फिल्टर केले जाते. पाणी फिल्टर झाले की, लिंबाळा येथील स्टोरेज टाकीमध्ये सोडले जाते. दर पंधरा दिवसाला स्टोरेज टाकी स्वच्छ केली जाते. ही स्टोरेज टाकी २० लाख लीटरची आहे. यानंतर, पाणी शहरातील नळधारकांना सोडले जाते.
- डॉ.अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, नगरपरिषद.