हिंगोलीतील चौंडी फाट्यावर दोन गट भिडले; तूफान दगडफेक, हाणामारीत एकाचा मृत्यू
By विजय पाटील | Published: January 24, 2024 01:38 PM2024-01-24T13:38:00+5:302024-01-24T13:38:27+5:30
पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
हिंगोली: वसमत तालुक्यातील चौंडी फाट्यावर जुनूना गावातील दोन गटांंनी दगडफेक केली. यानंतर येथेच हाणामारीही झाली. या हाणामारीत चाकूचा वार बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती सुस्थितीत आणली. ही घटना २४ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेदरम्यान घडली.
जुनुना गावातील वादातून ही घटना घडली असल्याचे यावेळी प्रत्यक्षदर्शीने सांगितले. वेळीच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दोन गटाच्या वादात एकाचा मृत्यू झाल्यामुळे भागात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चौंडी फाट्यावर दोन गट आमने-सामने आले. जुन्या वादातून ही घटना घडली. यावेळी शिवीगाळ करीत तुफान दगडफेक करण्यात आली. नेमके झाले काय? कोण कोणाला हाणामारी करत आहे ? हेच कळत नव्हते. या दगडफेकीत राहुल गवळी याच्यावर चाकूचा वार झाला. त्यामुळे तो जागीच मृत्यू पावला. त्यामुळे चोंडी फाट्यावर परिस्थिती तणावपूर्वक बनली होती. बाहेर गावाच्या नागरिकांनी चौंडी फाट्यावर येत भांडण केले आणि नंतर त्या भांडणाचे हाणामारीत रुपांतर झाले.
कुरुंदा पोलिस पोहोचले घटनास्थळी...
चोंडी फाट्यावर दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. ही माहिती कळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, गजानन मोरे, वाघमारे, गवळी व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी नागरिकांची झाली होती. जुनूना येथील हा जुना वाद जुनाच असून त्यातून एकमेकांना मारण्यापर्यत घटना घडत आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल केले जातील, असेही पोलिसांनी सांगितले.