हिंगोलीत आलेल्या युवकाकडून दोन गावठी पिस्तुलांसह १० काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 07:42 PM2022-07-26T19:42:11+5:302022-07-26T19:42:28+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील एकजण दोन गावठी पिस्टले व जिवंत काडतूस घेऊन हिंगोलीमार्गे परभणीकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली
हिंगोली : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाकडून दोन पिस्टले व १० जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशन ते बडेरा कॉम्प्लेक्स रोडवर सोमवारी (दि. २६) दुपारी केली. आरोपीने पिस्टल कोणाकडून खरेदी केले, तो कोणाला विक्री करणार होता, याचा तपास पोलीस करीत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील एकजण दोन गावठी पिस्टले व जिवंत काडतूस घेऊन इंटरसिटी एक्स्प्रेसने परभणीकडे जाणार असून, त्यापूर्वी हिंगोली शहरात नातेवाइकांकडे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने रेल्वे स्टेशन ते बडनेरा कॉम्प्लेक्स रोडवर २० वर्षीय युवकाची तपासणी केली असता त्याच्याकडे दोन गावठी बनावटीची पिस्टले व १० जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच त्याचे नाव यशपालसिंग ऊर्फ करतारसिंग काजलसिंग जुनी (रा. निमखेडी, ता. संग्रामपूर) असे असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू, सुनील गोपीनवार, जमादार संभाजी लेकुळे, भगवान आडे, शेख शकील, विशाल घोळवे, राजूसिंग ठाकूर, किशोर कातकडे, शंकर ठोंबरे, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, विठ्ठल काळे, आकाश टापरे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.