जुन्या वादातून शालेय विद्यार्थ्यांचे दोन गट भिडले; चाकू हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:10 IST2025-01-28T16:07:07+5:302025-01-28T16:10:50+5:30
चाकू हल्ल्यात गंभीर जखमी विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर; उपचारासाठी नांदेड हलविले

जुन्या वादातून शालेय विद्यार्थ्यांचे दोन गट भिडले; चाकू हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी
वसमत (जि. हिंगोली): शहरातील जिल्हा परिषद मैदानावर एका १९ वर्षीय शालेय विद्यार्थ्यावर जुन्या वादातून चाकू हल्ला करण्यात आला आसल्याची माहीती पोलीसांनी दिली आहे. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्यास उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही घटना मंगळवार दुपारी साधारणत: एक वाजेदरम्यान घडली.
शहरातील जिल्हा परिषद मैदानावर २८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेदरम्यान शालेय विद्यार्थ्यांत जुन्या वादातून वाद झाला. या घटनेत एका १९ वर्षीय विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमीस उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. शहर पोलिस जखमीच्या जवाबासाठी नांदेड येथे गेले असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांनी दिली. याप्रकरणी तक्रार येताच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.