रामाकृष्ण सीटी भागात दोन घरे फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:30 AM2021-02-10T04:30:22+5:302021-02-10T04:30:22+5:30
हिंगोली शहरातील बळसोंड येथील रामाकृष्ण सीटी भागात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. मागील महिन्यातच चोरीच्या घटना घडल्या होत्या. या ...
हिंगोली शहरातील बळसोंड येथील रामाकृष्ण सीटी भागात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. मागील महिन्यातच चोरीच्या घटना घडल्या होत्या. या चोरीचा तपास लागला नाही तोच पुन्हा चोरट्यांनी पोलिसांना आव्हान देत दोन घरे फोडली. रामाकृष्ण सीटी भागातील शिवाजी राजाराम आदमाने यांच्या भावाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला. आदमाने यांच्या भावाच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तसेच बेडरूमधील लोखंडी कपाटातील रोख ३४ हजार ५०० रुपये तसेच २ लाख ३१ हजार ७०० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने लंपास केले. या घटनेनंतर याच भागात असलेल्या राजेंद्रसिंग नेपालसिंग ठाकूर यांच्या घराकडे चोरट्यांनी मोर्चा वळविला. येथे ३० हजार ८०० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने लंपास केले. दोन्ही घटनेत २ लाख ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, स. पो. नि. बंदखडके, पोलीस उपनिरीक्षक तायडे, पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शिवाजी राजाराम आदमाने यांच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे तपास करीत आहेत.