मुलीस फूस लावून पळविल्याच्या दोन घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:45 PM2019-09-17T23:45:42+5:302019-09-17T23:46:06+5:30
वसमत तालुक्यातील गिरगाव येथे एका मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी ५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीमध्ये वर्गमित्र, मैत्रिणींचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुुरूंदा : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे एका मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी ५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीमध्ये वर्गमित्र, मैत्रिणींचा समावेश आहे. १६ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला होता. १७ रोजी या प्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरगाव येथील एका विद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी मैत्रिणीसोबत शाळेत जाण्यासाठी घराबाहेर निघाली; परंतु १६ सप्टेंबर रोजी ती घरी न आल्याने तिचा शोध घेतला; परंतु शोध न लागल्याने १७ सप्टेंबर रोजी याप्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
एका मुलीस फूस लावून मोटारसायकलवर बसवून कोणीतरी पळवून नेले. यामध्ये तिच्या मैत्रिणीसह वर्गमित्र, बाहेरगावातील आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मोठा जमाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. ठाण्याच्या आवारात गर्दी झालेली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात आरोपी योगेश जगताप (रा.सोमठाणा), राजू नादरे, प्रशांत नादरे, प्रमोद नादरे, विद्या नादरे (सर्व रा. गिरगाव) यांच्याविरूद्ध कलम ३६३, २१२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत एका आरोपीला ताब्यात घेतले होते.
फूस लावून अल्पवयीन मुलीस पळविले
नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील कडती येथील अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळविल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली आहे. कडती येथील अल्पवयीन मुलगी ही नर्सी येथील शिलाई मशीनवर ब्लाऊज शिवण्याकरीता रविवारी सकाळी ११ वाजता घराबाहेर पडली ती परत आलीच नाही.
मुलीच्या वडिलाच्या तक्रारीवरून आरोपी रणजित माधव चव्हाण रा.लोहगाव याच्याविरूद्ध नर्सी पोलीस ठाण्यात मुलीस फूस लावून पळविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नर्सी ठाण्याचे सपोनि सुनील गोपिनवार करीत आहेत.