बस आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत मामा-भाचे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 03:14 PM2019-12-19T15:14:51+5:302019-12-19T15:24:41+5:30
गोळेगाववरून औंढा नागनाथकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांचा मृत्यू
औंढा नागनाथः तालुक्यातील जिंतूर टि पाईट नजीक भरधाव येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसनेने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात एक तरुणजागीच ठार झाला तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडला. प्रथमेश प्रकाश थीठे ( २२, गोळेगाव) व श्रीराम नागोराव पाटील ( तोंडपूर ) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही नात्याने मामा-भाचे लागत असल्याची माहिती आहे.
कळमनुरी -पुणे (एम एच 20 बी एल 2854 ) ही बस कळमनुरीवरुन पुणे कडे मार्गस्थ होती. तर गोळेगाव येथून प्रथमेश प्रकाश थीठे व श्रीराम नागोराव पाटील हे दुचाकीवरून (एम एच 38L 8956 ) औंढानागनाथ जात होते. दरम्यान, जिंतूर टि पाईट नजीक बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात प्रथमेश जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी असलेले श्रीराम यांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी माजी उपसभापती अनिल देशमुख, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख , संतोष हाके, सुभाष कुटे , सुरेश चव्हाण, लखन पावडे, उद्धव नागरे, गंगाधर हाके, विलास पवार, दत्ता कपाटे, गजानन शिंदे यांनी मदत केली.