वारंगा फाटा येथे दुचाकी अपघातात दोन ठार; एक जखमी
By यशवंत भीमराव परांडकर | Published: July 3, 2023 03:29 PM2023-07-03T15:29:05+5:302023-07-03T15:30:22+5:30
बहुतांश ठिकाणी अस्ताव्यस्त वाहने लावणे व वाहने बेशिस्तपणे चालविण्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक झाले असून यामुळे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहेत.
- विश्वास साळुंके
वारंगा फाटा (जि. हिंगोली): कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे दुचाकीला झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून, एक जण जखमी झाला. ही घटना घडली २ जुलै रोजी रात्री दहा वाजेदरम्यान घडली.
२ जुलै रोजी रात्री साडेनऊ ते दहा चे सुमारास नांदेडकडून वारंगाकडे एका हॉटेल समोर दुचाकी (क्र. एमएच २६-०६२६) क्रमांकाच्या गाडीचा अपघात झाला. यामध्ये मयूर केशवराव दुबे (वय २२, रा. शुक्रवारपेठ,वाशिम) याचा जागीच मृत्यू झाला. तर विष्णू बालाजी पाटील (वय २२, रा. शिवनी बुद्रुक, जि. लातूर) याचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती वारंगाफाटा पोलिस मदत केंद्राचे बीट जमादार रोहिदास राठोड यांनी दिली. अन्य एक जण यांच्या समवेत जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याचे नाव मात्र समजू शकले नाही. बातमी लिहीपर्यंत आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यामध्ये कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता.
नांदेड ते हिंगोली, नांदेड ते नागपूर हे वारंगा फाटा येथून जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग जवळपास पूर्ण झाले आहेत. त्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू आहे. बहुतांश ठिकाणी अस्ताव्यस्त वाहने लावणे व वाहने बेशिस्तपणे चालविण्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक झाले असून यामुळे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहेत. महामार्ग पोलिस हे वाहन आडवणे, तपासणे यातच तत्पर असून अशा अपघातस्थळी मात्र मोठ्या उशिराने हजर होत आहेत.