औंढ्यात तलाठी कार्यालयासह दोन दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:39 AM2018-01-11T00:39:25+5:302018-01-11T00:41:48+5:30
शहरातील नागेश्वरनगरमध्ये समोरासमोर असलेल्या दोन किराणा दुकाणा दुकानांचे शटर वाकवून दीड लाख रुपयांच्या साहित्यासह परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयातून मूळ दस्तावेज चोरी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : शहरातील नागेश्वरनगरमध्ये समोरासमोर असलेल्या दोन किराणा दुकाणा दुकानांचे शटर वाकवून दीड लाख रुपयांच्या साहित्यासह परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयातून मूळ दस्तावेज चोरी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नागेश्वरनगरमधील त्रिधारा व साई किराणा अशी दोन दुकाने आहेत. मंगळवारी दोन्ही व्यापाºयांनी नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी आपली दुकाने बंद केली. सध्या थंडीचा कडाका वाढत असल्याने रस्त्यावर रात्री लवकरच शुकशुकाट पसरतो. नेमक्या याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन्ही दुकानांचे शटर वाकवून दुकानांत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सामानासह चैनीचे साहित्य लंपास केले. तसेच याच भागात असलेल्या दुधाळा व जलालदाभा या तलाठी सज्जा कार्यालयातून दुधाळा गावाचे मूळ दस्तावेज चोरी झाल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच आज सकाळी फौजदार साईनाथ अनमोड यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पंचनामा केला आहे. या घटनेत चोरट्यांनी लहान मुलांचा वापर केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावरुन पोलिसांना चोरी करण्यासाठी वापरलेली हत्यारे सापडली. दुकानमालक रवि गायकवाड व नवनाथ राऊत यांच्या दोन्ही दुकानातून जवळपास दीड लाख रुपयांचे साहित्य चोरी झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे.
दोन्ही दुकानांसमोर असलेल्या एका घराबाहेरील सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यास मदत मिळणार असून लवकरच या घटनेचा छडा लागणार असल्याची माहिती फौजदार अनमोड यांनी दिली आहे. तसेच घटनास्थळी आज सकाळी श्वान पथकाला पाचारण केले असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे.