सेनगाव तहसीलमधून दोन टिप्पर पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:11 AM2018-12-14T01:11:12+5:302018-12-14T01:11:32+5:30
येथील तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाने बुधवारी मध्यरात्री वाळू चोरी करणारे दोन टिप्पर पकडले होते. मात्र पथक पुढील कारवाईला जाताच तहसीलच्या आवारातून शिपायाला धक्काबुकी करुन दोन्ही वाहने दंडात्मक कारवाईच्या भीतीने पळविल्याचा प्रकार घडला आहे.
सेनगाव : येथील तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाने बुधवारी मध्यरात्री वाळू चोरी करणारे दोन टिप्पर पकडले होते. मात्र पथक पुढील कारवाईला जाताच तहसीलच्या आवारातून शिपायाला धक्काबुकी करुन दोन्ही वाहने दंडात्मक कारवाईच्या भीतीने पळविल्याचा प्रकार घडला आहे.
तालुक्यात वाळू चोरीविरोधात तहसीलदार वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज पथकांची स्थापना केली आहे. तालुक्यातील विविध भागात रात्रीला मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याने याविरोधात बुधवारी रात्री बाराच्या सुमारास पानकनेरगाव शिवारात गौणखनिज पथक प्रमुख मंडळ अधिकारी जी.जी. धुळे, तलाठी राजकुमार शेळके, नीलेश गुडलवार, महेश गळाकाटू, भास्कर पांडे, संदीप थोरात, एस. डी. मुसळी आदींनी वाळू चोरी करणारे विनाक्रमांकाचे दोन टिप्पर पोलिसांच्या सहकार्याने पकडले.
ही वाहने पथकाने तहसीलला आणून लावत शिपायाकडे सुरक्षेची जबाबदारी दिली. पथक कारवाईकरिता गोरेगाव भागात रवाना झाले. पथकाने या भागातही एक ट्रॅक्टर पकडले. तेव्हा दोन्ही टिप्पर तहसीलमधून शिपायाला धक्काबुकी करून पसार झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. यात पथकाने पसार झालेल्या वाहनाचा अहवाल तहसीलदार वैशाली पाटील, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्याकडे दाखल केला आहे. यासंबंधी पथक प्रमुख जी.जी. धुळे यांच्याशी संपर्क साधला असता दोन्ही पसार झालेल्या वाहनाचा अहवाल आपण दाखल केला असून वरिष्ठ अधिकारी पुढील कारवाईचा निर्णय घेतील, अशी माहिती दिली.