चंद्रयान, राममंदिराचा मुद्दा समोर आणतील; सत्तेसाठी भाजप दंगली घडवेल: उद्धव ठाकरेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 06:34 PM2023-08-27T18:34:56+5:302023-08-27T18:35:07+5:30
'सध्या जनतेच्या पैशांवर सरकार आपल्या दारी अन् थापा मारतय लय भारी अशी परिस्थिती सुरू आहे.'
विजय पाटील
हिंगोली : आगामी काळात सत्तेसाठी चंद्रयान, राममंदिराचा मुद्दा समोर आणतील, मंदिराच्या कार्यक्रमाला लोकांना नेऊन दंगली घडवतील, असे भाजपचेच सत्यपाल मलिक व खा. महुआ मोईत्रा यांनी म्हटले. निवडणुकांसाठीच पुलवामा घडला होता, तेव्हा सावध राहा, असे प्रतिपादन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोली येथील सभेत केले.
या सभेत ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तसेच भाजपवर सडकून टीका केली. भाजपचे हिंदुत्व दुतोंडी असल्याचा आरोपही केला. तर माझ्या वडिलांनी मला असे हिंदुत्व शिकविले नसल्याचे ते म्हणाले. तर आता हा लढा मोदीविरोधी नाही, तर लोकशाहीप्रेमी व लोकशाहीविरोधी असा आहे. घटना वाचविण्यासाठी हा लढा आहे. गावागावांत भगवा घेऊन या विचारांची मशाल पेटवा, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.
सध्या जनतेच्या पैशांवर सरकार आपल्या दारी अन् थापा मारतय लय भारी अशी परिस्थिती सुरू आहे. शेजारच्या जिल्ह्यात ते हा कार्यक्रम घेत आहेत. केंद्रातील असो वा राज्यातील सरकार केवळ ‘सबको लाथ आणि दोस्तों का विकास’ हेच धोरण राबवत असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.
ठाकरे म्हणाले, ‘भाजप सबका साथ, सबका विकास’ म्हणत जनतेसमोर येते. मात्र, नंतर फक्त आपल्या दोस्तांचा विकास करते. त्यामुळे ९ वर्षांत जनता कुठे आहे अन् दोस्त जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ही दोस्तशाही गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. काही बाहेरची मंडळी किसान सरकार म्हणून भाजपची सुपारी घेऊन आली आहे. त्यांनी आपलेच घर सांभाळावे. त्यांच्याच बुडाखाली सुरूंग लागलाय. त्यांनी लोकशाहीप्रेमी असल्यास इंडियात यावे अन्यथा थेट भाजपसोबत तरी जावे, असेही ते म्हणाले.
मी सत्तेवर असल्याच्या अडीच वर्षांत अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. उद्योगही यायला तयार होते. मात्र, नंतर गद्दारांचे सरकार आले. त्यांनी उद्योग गुजरातला पाठविले. राज्य व केंद्र सरकार शेतकरी हिताचे तेवढे चिरडून टाकत आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव व ग्राहकांनाही योग्य भावात मिळवून देणे सरकारचे काम. मात्र, सरकारने कांदा उत्पादकांना जसे छळले तीच गत इतर मालांचीही आहे. भाजपचे निष्ठेने काम करणाऱ्यांची सतरंजी झाली असून बाहेरून येणारे त्यांच्या छातीवर बसले. त्यांची दया येते. चांगले नेते तयार करण्याची ताकद भाजपमध्ये नाही. त्यांना नेते, कार्यकर्ते चोरावे लागतात. दिल्लीच्या वडिलांची किंमत राहिली नाही म्हणून माझे वडील चोरावे लागतात. इतर पक्षांतून नेते मागविणार असाल तर ही नामर्दानगी आहे, अशी जहरी टीका केली.
..तर मोदी घमेंडिए
आम्ही इंडिया म्हटले तर पंतप्रधान मोदी घमेंडिया म्हणतात. मग ते घमेंडिए आहेत. आधी हे महेबुबा मुफ्तीसमवेत बसले अन् आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करतात. आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीनशी करतात. ते आमच्या अगोदरचे आहेत. मग आफ्रिकेत ते भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले होते की, इंडियन मुजाहिद्दीनचे? असा सवाल केला.
फडतूस, कलंक, थापाड्या म्हणणार नाही
मी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलायचे सोडून दिले. फडतूस, कलंक, थापड्या असे काही म्हणणार नाही, असे ठाकरे म्हणाले. त्यानंतर टरबूज, टरबूज.. अशी घोषणाबाजी मंडपातून सुरू झाली तेव्हा त्यालाही पाणी लागते, ही मंडळी दुष्काळाकडे दुर्लक्ष करत असल्याची कोपरखळी मारली.