दलित वस्ती सुधार नियोजनातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:41 AM2018-03-08T00:41:35+5:302018-03-08T00:41:42+5:30
दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचे नियोजन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. २६ पैकी २0 कोटींचे नियोजन झाल्याचे सांगितले जात असले तरीही त्यात पालकमंत्र्यांच्या शिफारसींची कामे का घ्यायची यावरून अनेक सदस्यांची बोंब अजूनही सुरूच आहे. त्यामुळे या कामांचे आदेशच निघत नसल्याची ओरड आता होवू लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचे नियोजन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. २६ पैकी २0 कोटींचे नियोजन झाल्याचे सांगितले जात असले तरीही त्यात पालकमंत्र्यांच्या शिफारसींची कामे का घ्यायची यावरून अनेक सदस्यांची बोंब अजूनही सुरूच आहे. त्यामुळे या कामांचे आदेशच निघत नसल्याची ओरड आता होवू लागली आहे.
जिल्हा परिषदेला निधी खर्च करण्याची दोन वर्षांची मुभा असल्याने कामे संथ गतीने करण्यासाठी काही विभाग प्रसिद्ध आहेत. मात्र काही विभागांच्या कामांना गती मिळावी, यासाठी सदस्यांची अपेक्षा असतानाही तसे होताना दिसत नाही. यावेळी तर अनेक सदस्य पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने ताळमेळाचा अभावच दिसून येत आहे. आता काहींनी दलित वस्तीच्या कामांचे नियोजन झाले तरीही घोडे कुठे अडले? यावरून सदस्य आता विचारणा करताना दिसू लागले आहेत. हिंगोली जिल्ह्याला या योजनेत तब्बल २६ कोटी मंजूर आहेत. आधी तीस टक्के कपातीची कात्री लागल्याने या योजनेत १८ कोटींचेच नियोजन करावे लागणार होते. मात्र नंतर शासनाने कपात उठविली अन् पूर्ण निधीच्या नियोजनाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र बीडीएसवर पूर्ण रक्कमच उपलब्ध झालेली नसल्याने तेवढ्याचे सध्याच नियोजन करण्यात आले नसल्याचे सदस्य सांगत आहेत.
आता मागील दोन दिवसांपासून काही सदस्यांनी नियोजन झाल्यानंतरही या कामांचे आदेश निघत नसल्याबाबत बोंब सुरू केली आहे. त्यात प्रामुख्याने पालकमंत्र्यांनी शिफारस केलेल्या कामांवरून असलेली दबकी ओरड आता उघड होत आहे. पूर्वी कधीच नसलेली नवी परंपरा कशासाठी निर्माण केली जात आहे? यावरून ही बोंब आहे. मात्र यात तथ्य किती हे कळायला मार्ग नाही. याबाबत गोपनियता पाळली जात असली तरीही बोंब होत असल्याने हे खरेही वाटत आहे.