कळमनुरीत ७५ गावांत पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:51 AM2018-06-19T00:51:21+5:302018-06-19T00:51:21+5:30
तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यात दोन दमदार पाऊस पडले परंतु जलसाठा वाढला नाही. अजूनही विहिरी-नाले कोरडेच आहेत. सध्या ७५ गावांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. अर्धा अधिक तालुका तहानलेलाच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यात दोन दमदार पाऊस पडले परंतु जलसाठा वाढला नाही. अजूनही विहिरी-नाले कोरडेच आहेत. सध्या ७५ गावांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. अर्धा अधिक तालुका तहानलेलाच आहे.
मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पावसाळा सुरु असूनही पाणीटंचाई कायम आहे. सध्या ६६ गावांत ९३ अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीला आलेले आहेत. त्यापैकी ३७ प्रस्तावांना तहसिलदारांची मंजुरी मिळाली आहे. उर्वरित प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ९ गावांत ८ टँकरने पाणीपुरवठा उन्हाळ्यात केला. १५ दिवसांपूर्वी दोन दमदार पाऊस पडले. त्यामुळे सध्या या गावात टँकर बंद करण्यात आले आहेत. पाणबुडी वस्ती, माळधावंडा, शिवणी र्खु, हातमाली, रामवाडी, महालिंगी तांडा, मसोड, कुपटी या गावांना उन्हाळाभर टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तालुक्याचा साडेचार कोटीची संभाव्य पाणीटंचाई आराखडा प्रशासनाने मंजूर केला आहे. पाणीटंचाई आराखड्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्याचे चित्र आहे.
पेरणीतही ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अजूनही विहीरी हातपंप कोरडेठाक पडले आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरीकांची वणवण भटकंती सुरु आहे. १५ जूनपासून शाळा सुरु झाल्या असून अनेक शाळांतही पाण्याची टंचाई जाणवत आहे. ९ गावात पुन्हा टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.