एकमेकांना समजून घेतल्यास संवाद सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:28 AM2019-01-19T00:28:12+5:302019-01-19T00:28:32+5:30
जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ असल्याशिवाय कुणालाही सामाजिक जीवनात चांगल्या पद्धतीचे काम करता येत नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेल असे नाही. त्यामुळे राग, त्रागा केल्यास स्वत:ला आणि इतरांनाही त्रास आहे. मात्र समजून घेत समोरच्याशी संवाद साधला तर काम करणे सुकर जाते, असे खा.अॅड.राजीव सातव म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ असल्याशिवाय कुणालाही सामाजिक जीवनात चांगल्या पद्धतीचे काम करता येत नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेल असे नाही. त्यामुळे राग, त्रागा केल्यास स्वत:ला आणि इतरांनाही त्रास आहे. मात्र समजून घेत समोरच्याशी संवाद साधला तर काम करणे सुकर जाते, असे खा.अॅड.राजीव सातव म्हणाले.
ते म्हणाले, कुठल्याही क्षेत्रात एखादी भूमिका चांगल्या पद्धतीने व पटेल अशा पद्धतीने मांडली तर लोकांना ते आवडते. राग, चिडचिडेपणा नसला तर लोकांच्या मनाचा ठाव घेवून त्याच्या कलाने वागता येते. त्यामुळे समोरच्याचे समाधान होते. लोकांच्या अपेक्षांनुसार काम करण्याची भूमिका ठेवल्यास आपल्याला रागापर्यंत पोहोचण्याची गरजच पडत नाही. त्यांना समजेल अशा पद्धतीने वागताना सयंमाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर समोरच्यालाही चांगले वाटते. तरीही मानवी प्रवृत्तीत राग येणे साहजिक आहे. मात्र अशावेळी भीतीपोटी म्हणून नव्हे, तर आणखी चुका टाळण्यासाठी माघार घेणेच अधिक चांगले. कारण रागामुळे माणसे जोडण्याऐवजी दूर जातात. राजकीय क्षेत्रात काम करताना रोज शेकडो लोकांशी भेटी-गाठी होतात. नवनव्या समस्या समोर येतात. त्या सोडविताना कधी नियम-अटींचा विलंब होतो. अशावेळी राग नियंत्रणात ठेवत काम करून घ्यायचे म्हणजे कसरत होते.
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमिवर प्रत्येकाने गुड बोला, गोड बोला आणि तसेच चांगले वागूया, असा संकल्प करण्याची गरज आहे. लोकमतने हाती घेतलेल्या या उपक्रमास माझ्या शुभेच्छा. खरेतर सर्वच दृष्टिने हा उपक्रम चांगला, आरोग्यदायी व अनुकरणीय आहे.