जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी
By विजय पाटील | Published: October 20, 2023 04:52 PM2023-10-20T16:52:41+5:302023-10-20T16:54:45+5:30
हिंगोली जिल्ह्यातील पांगरा (शिंदे) व पार्डी (खुर्द) ग्रामपंचायतींनी घेतला ठराव
हिंगोली: गत ७० वर्षापासून मराठा समाजाला प्रत्येक सरकार आरक्षणाचे गाजर दाखवत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. त्यांच्या मागणीला पाठिंबा देत वसमत तालुक्यातील पार्डी (खुर्द) व पांगरा (शिंदे) येथील ग्रामपंचायतींनी एकमुखी ठराव घेऊन गावात कोणत्याही पुढाऱ्यांना (मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक) प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
१९ ऑक्टोबर रोजी पार्डी खुर्द येथील मारोती मंदिरासमोरील ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच गोविंद रामराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. जोपर्यंत मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत कोणत्याही पुढाऱ्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, तसेच प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे, असा एकमुखी ठराव घेतला.
‘एक मराठा लाख मराठा’ ची दिली घोषणा...
पार्डी खुर्द व पांगरा शिंदे येथील ग्रामपंचायतीने बैठक घेऊन नुसता इशाराच दिला नाही तर हा ठराव कृतीत उतरविला आहे. गावातील सकल मराठा समाजाची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते राजकीय व्यक्तीला गावात येण्यास मज्जाव केला आहे. सर्व मराठा समाजाने या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत आमदार, खासदार, मंत्री यांना मंडळीना पार्डी व पांगरा येथे पाऊल टाकता येणार नाहीत. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ ची घोषणा देण्यात आली.