कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय ! काळजी न घेतल्यास होऊ शकते इजा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:32 AM2021-08-27T04:32:26+5:302021-08-27T04:32:26+5:30
हिंगोली : तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण चष्म्याशिवाय आता कॉन्टॅक्ट लेन्स वापरू लागले आहेत. मात्र म्हणावी तशी काळजी घेताना काही ...
हिंगोली : तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण चष्म्याशिवाय आता कॉन्टॅक्ट लेन्स वापरू लागले आहेत. मात्र म्हणावी तशी काळजी घेताना काही दिसत नाहीत. कॉन्टॅक्ट लेन्स वापरा, पण त्याची काळजीही चांगल्या पद्धतीने घ्या, असा मोलाचा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे.
चष्म्याचा जास्त नंबर असेल तर अधूनमधून कॉन्टॅक्ट लेन्स वापरायला काही हरकत नाही. पण रात्री झोपतेवेळेस कॉन्टॅक्ट लेन्स काढूनच झोपावे. कारण यामुळे डोळ्याला इजा होण्याची दाट शक्यता असते. बहुतांश रुग्ण कॉन्टॅक्ट लेन्स झोपताना काढत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांना दवाखान्यात जाण्याची पाळी येते. डोळे दुखत आहेत, डोळ्यांचे काठ दुखत आहेत, अशा अनेक तक्रारी रुग्णांकडून ऐकायला मिळतात. अशा वेळी त्यांना कॉन्टॅक्ट लेन्स काढून झोपा असा सल्ला द्यावा लागतो.
चष्म्याला करा बाय बाय...
ज्या रुग्णांनी कॉन्टॅक्ट लेन्स बसविला आहे. अशा रुग्णांनी चष्मा काढला तरी चालेल. परंतु, दोन्ही एका वेळेस वापरू नका. एक तर चष्मा वापरा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स. विशेष म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्सची काळजी मात्र आवश्यक घ्या. कारण कॉन्टॅक्ट लेन्स फार महत्त्वाचे असते.
नेत्रतज्ज्ञ काय म्हणतात...
कॉन्टॅक्ट लेन्स टाळल्यास बरे राहील. डोळ्यास झालेले इन्फेक्शन बरे होण्यास बराच कालावधी लागतो. त्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. परिणामी रुग्णांवर दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ शकते. मुला-मुलींचा मायनस नंबर जास्त असतो. मोबाइलवर जास्त वेळ राहिल्यास किंवा संगणकावर जास्त वेळ काम केल्यास मोठा नंबर येऊ शकतो. चष्मा घालविण्यासाठी लेझर सर्जरी करून घेण्यास काही हरकत नाही. रुग्णांनी कॉन्टॅक्ट लेन्स बसविल्यास त्याची काळजी मात्र जरूर घ्यावी. विशेष सांगायचे म्हणजे धुळीपासून सावध राहणेही गरजेचे आहे.
- डॉ. किशन लखमावार, नेत्रतज्ज्ञ, हिंगोली
ही काळजी ...
चष्मा लावायचा असेल तर तो नेहमी आणि नित्यनेमाने लावावा. त्यात खंड पडू देऊ नये. झोपते वेळेस कॉन्टॅक्ट लेन्स काढणे अत्यंत आवश्यक असते. एक तर चष्मा लावा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरा. दोन्हीपैकी एकाचाच वापर केल्यास इजा होण्याचा कमी धोका असतो. कॉन्टॅक्ट लेन्स लावल्यानंतर काही त्रास होत असेल तर लगेच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. इतर खासगी व्यक्तीला कॉन्टॅक्ट लेन्सबाबत काहीही सांगू नये.