माणसांचे लसीकरण लांबले अन जनावरांचे लटकले...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:30 AM2021-05-18T04:30:45+5:302021-05-18T04:30:45+5:30
हिंगोली : जिल्ह्यात सध्या केवळ ४५ वर्षावरील व्यक्तींना व दुसरा डोस घेणाऱ्यांचेच कोरोना लसीकरण सुरू आहे. एकीकडे माणसांचे लसीकरण ...
हिंगोली : जिल्ह्यात सध्या केवळ ४५ वर्षावरील व्यक्तींना व दुसरा डोस घेणाऱ्यांचेच कोरोना लसीकरण सुरू आहे. एकीकडे माणसांचे लसीकरण लांबले असताना जनावरांचे मे महिन्यात होणारे लसीकरणही लटकले आहे. दरम्यान, मागील वर्षभरात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कोरोना काळात जनावरांना विविध प्रकारच्या ५७ लाख ८ हजार १७१ लसीचे डोस देण्यात आले.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाने मास्कचा वापर करणे, कोरोना टेस्ट घेणे यासह लसीकरण हाती घेतले आहे. मात्र मर्यादित कोरोना लसीचा पुरवठा होत असल्याने १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. सध्या केवळ ४५ वर्षे वयोगटावरील व दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. एकीकडे माणसांचे लसीकरण लांबले असताना दुसरीकडे जनावरांच्या लसीकरणावरही परिणाम होत आहे. वरिष्ठ स्तरावरून जनावरांच्या लसी उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने काही दिवसांपासून लसीकरण लटकले आहे. वर्षभर जनावरांचे लसीकरण प्रक्रिया सुरू राहत असली तरी बहुतांश पशुपालक मे व नोव्हेंबर महिन्यात तोंडखुरी, पायखुरी आदींच्या लसी जनावरांना देतात. हिंगोली पशुसंवर्धन विभागाने यात गतवर्षी कोरोना काळ असतानाही तब्बल ५७ लाख ८ हजार १७१ लसीचे डोस जनावरांना दिले. लसीकरणामुळे काही पशुसंवर्धन कर्मचारी, डॉक्टरांना कोरोना बाधितही व्हावे लागले.
जिल्ह्यात गतवर्षी कोरोना काळ असतानाही जनावरांना ५७ लाख ८ हजार १७१ लसीचे डोस देण्यात आले. लस उपलब्ध झाल्यानंतर कोरोनाचे नियम पाळून तत्काळ जनावरांचे लसीकरण करण्यात येईल.
जावळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. हिंगोली
कोणकोणत्या दिल्या जातात लस?
तोंडखुरी, पायखुरी यासह इतर संसर्गजन्य आजारापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना लस देण्यात येतात.
- काही लस ३ महिने, चार महिने, ६ महिन्यांच्या कालावधीनंतर दिली जाते.
- यामध्ये विविध आजारानुसार पॉलीव्हॅलेंट, एफएमडी, ॲथ्रॅक्स, स्पोअर, ईटी, एचएस, बीक्यू, पीओटी, आयव्हीआरटी आदी लस देण्यात येतात.
लसीकरणाची प्रक्रिया वर्षभर चालते
सर्वसाधारण नोव्हेबर व मे महिन्यात तोंडखुरी, पायखुरी आदी संसर्गजन्य आजारासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येते. मात्र काही लसी तीन, चार, सहा महिन्यांनी द्याव्या लागतात. त्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया वर्षभर चालते.
जनावरांचे दरवर्षी लसीकरण करत असतो. सध्या दवाखान्यात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण करायचे थांबले आहे.
- बाबूराव मोरे, पशुपालक
पशुसंवर्धन दवाखान्यात जनावरांचे लसीकरण करण्यात येत असते. मात्र दोन महिन्यात लसीकरण थांबले आहे. दवाखान्यांना लस उपलब्ध करून द्याव्यात.
- जीवन घुगे