‘वीर जवान अमर रहे’; अंकुश वाहुळकर यांच्यावर मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 04:03 PM2024-05-24T16:03:43+5:302024-05-24T16:05:03+5:30

लाडक्या मुलाचा तिरंग्यात लपेटून आलेला पार्थिवदेह पाहून आईने फोडला हंबरडा.

'Veer jawans remain immortal'; Ankush Wahulkar was cremated at native village Gunja with state honors  | ‘वीर जवान अमर रहे’; अंकुश वाहुळकर यांच्यावर मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

‘वीर जवान अमर रहे’; अंकुश वाहुळकर यांच्यावर मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

- इस्माईल जहागिरदार

वसमत ( हिंगोली): आईची माया ही जगावेगळी असते. अंगाखांद्यावर वाढविलेले लेकरू हे तिला सतत आपल्या डोळ्यासमोर बागडत येत असलेले दिसत असते. पण आज पहाटे लाडका मुलगा जवान अंकुश वाहुळकर यांचा पार्थिवदेह तिरंगा झेंड्यामध्ये पाहून आईने हंबरडा फोडला. सिक्कीम येथे कर्तव्यावर असताना २२ मे रोजी झालेल्या अपघातात वीर मरण आलेल्या जवान अंकुश यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वाहुळकर कुटुंब, नातेवाईक, गुंज ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील गावाकरी शोकाकूल झाले होते.

आज पहाटे ५ वाजता जवान अंकुश वाहुळकर यांचे पार्थिवदेह गुंज गावात आणण्यात आले. आणला होता. तिरंगा झेंडामध्ये लपेटलेला मृतदेह खाली उतरताना आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक, ग्रामस्थांच्या अश्रूंचा बांध फुटला. सकाळी ९ वाजता गावातून वाहुळकर यांचे घर ते शेतापर्यंत अंत्ययात्रा निघाली. यावेळी पोलिस व जवान हे रथाच्या बाजुने चालत होते. वीर जवान अंकुशचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतून ग्रामस्थ सकाळीच हजर झाले होते. 'वीर जवान अंकुश अमर रहे'च्या घोषणा देत सर्वजण अंत्ययात्रेत सहभागी झाले. वाहुळकर यांच्या शेतात पार्थिव देह आल्यानंतर विशेष पोलिस पथकाने बिगूल वाजवून सलामी दिली व आकाशात बंदूकीच्या तीन फैरी झाडल्या. त्यानंतर वडिल एकनाथ वाहुळकर व भाऊ शिवानंद वाहुळकर यांनी वीरजवान अंकुश वाहुळकर यांच्या चितेला भडाग्नी दिला.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार शारदा दळवी, उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, माजी नगराध्यक्ष अ. हफीज अ. रहेमान, कर्नल विशाल रायजादा, क्यपटन राहुल सिंग, संतोष कुमार, राजेश गाडेकर, मुकाडे, माजी सैनिक बाबूराव जांबुतकर, भालेराव हे अखेरचे अंत्यदर्शनासाठी हजर होते. वसमत तालुक्यातील गुंज या छोट्या गावातील लेकराची सैनिक म्हणून भरती व्हावी आणि ऐन तारुण्यात वीर मरण यावे, असा निष्ठूर खेळ नियतीने का केला? असा प्रश्न अंत्यदर्शनाच्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. 

वीर जवान अंकुशचा असा राहिला प्रवास...
वीर जवान अंकुश वाहुळकर याचा जन्म १६ जून १९९९ रोजी गुंज या गावी झाला. यानंतर ४ डिसेंबर २०२० रोजी सैन्यात भरती. पहिली पोस्टींग मल्हारी (उतराखंड), तर दुसरी पोस्टींग राची (झारखंड) येेथे मिळाली. त्यांनंतर सिक्कीम येथे कर्तव्यावर असताना २२ मे रोजी दुचाकीवरील एकाचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात सैन्य दलाच्या गाडीच्या अपघातात जवान अंकुश वाहुळकर यांना वीर मरण प्राप्त झाले.

Web Title: 'Veer jawans remain immortal'; Ankush Wahulkar was cremated at native village Gunja with state honors 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.