गावात दारू विक्री बंद करावी यासाठी चक्क ‘वीरूगिरी’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 05:37 AM2022-07-28T05:37:04+5:302022-07-28T05:37:26+5:30
युवकाने केला मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न
अरुण चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळाबाजार (जि. हिंगाेली) : औंढा तालुक्यातील कोंडशी गावात तातडीने दारू बंदी करण्यात यावी यासाठी एका युवकाने मोबाइल टॉवरवर चढून ‘वीरूगिरी’ करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्या ‘वीरूगिरी’ करणाऱ्या युवकाला खाली उतरविले.
कोंडशी गावात बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एका युवकाने मोबाइल टॉवरवर चढून गावात सुरू असलेली दारू विक्री बंद होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा निर्णय करत टॉवरवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी लगेच पोलिसांशी संपर्क साधला. पाहता पाहता कोंडशी गावातील नागरिक टॉवरजवळ जमा झाले.
मागच्या अनेक महिन्यांपासून कोंडशी गावामध्ये दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे पाहून गणेश हरिभाऊ गायकवाड (४२) याने गावातील एका मोबाइल टॉवरवर चढून जोपर्यंत गावामध्ये दारू विक्री बंद होत नाही तोपर्यंत खाली उतरायचे नाही, तसेच वेळप्रसंगीवरूनच उडी मारण्याचा चंग बांधला होता. यावेळी गावात चिंतेचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी तत्काळ हट्टा पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर जवळाबाजार चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे, जमादार भुजंग कोकरे, सुरेश भारशंकर, पाईकराव यांच्यासह इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
‘शोले’ चित्रपटाची झाली आठवण...
दारूबंदी तातडीने करण्यात यावी, युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यात यावे यासाठी टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न कोंडशी
गावातील युवकाने ‘वीरूगिरी’ करत केला. ज्यांनी ‘शोले’ चित्रपट पाहिला ते मात्र यावेळी म्हणत होते ‘आता काही खरे नाही, आपला ‘वीरू’ दारूबंदी
नक्की करणार.
टॉवरवर चढलेल्या युवकाचे समुपदेशन करून पोलिसांनी त्याला खाली उतरविले. त्यावेळी कुठे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दारूबंदीबाबत गावामध्ये लवकरच बैठक घेऊन दारू विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे यांनी गावकऱ्यांना दिले.
उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी गावात फिरकत नसल्यामुळे दारू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागली आहे. परिणामी, व्यसनाधीनतेचे प्रमाणही वाढू लागले असल्याचे नागरिकांनी सांगितले.