विम्यासाठी अपघातातील वाहनच बदलले; अर्जदार, फौजदाराविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 03:16 PM2021-10-25T15:16:53+5:302021-10-25T15:17:40+5:30
गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आले म्हणून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी दावा दाखल केला होता
हिंगोली : अपघात प्रकरणी तक्रारदारास नुकसान भरपाई द्यावी लागू नये, तसेच ठाणे अंमलदार व तपासी अधिकाऱ्याच्या मदतीने विमा असलेले वाहन अपघातातील गुन्ह्यात दाखवून विमा कंपनीला नुकसान पोहचविण्याच्या उद्देशाने खोटा दोषारोप दाखल केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चार जणांविरूद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. यात एका विद्यमान पोलीस उप निरीक्षकाचा समावेश आहे.
वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर २०१३ रोजी सखाराम गंगाधर दळवी (रा. जवळा बाजार, ह.मु. वांगी रोड परभणी) यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल मारोतराव इंगळे (रा. वडद) याचेवर गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करून तत्कालीन तपासीक अंमलदारांनी २० जानेवारी २०१४ रोजी न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. सदर अपघातामध्ये सखाराम दळवी यांनी त्यांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आले म्हणून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मोटार वाहन कायद्यान्वे श्रीराम सतीषभाऊ सोमाणी (रा. जवळा बाजार), दी आयसीआयसी लोबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीविरूद्ध अध्यक्ष मोटार वाहन अपघात न्यायाधिकरण परभणी (न्यायासन उर्मिला एस. जोशी -फलके) यांच्या न्यायालयात दावा दाखल केला होता.
मात्र, सदर प्रकरणात विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळविण्याच्या हेतूने व तपासी अधिकाऱ्याच्या मदतीने अपघातात समाविष्ट नसलेले वाहन जे विम्याने संरक्षीत आहे, असे दाखविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे न्यायालयाने मोटार वाहन अपघात दावा हा खर्चासह रद्द केला. तसेच अर्जदार, वाहनधारक, ठाणे अंमलदार व गुन्याचा तपास करणाऱ्याविरूद्ध कार्यवाही करावी, असे आदेश हिंगोली पोलीस अधीक्षकांना दिले होते. तसेच कार्यवाहिच्या अनुषंगाने अहवाल न्यायालयास सादर करावा, असेही आदेशात म्हटले होते. त्यानुसार सदर गुन्ह्याचे सर्व रेकॉर्ड, गुन्ह्याचे तपासाचे अभिलेखे तसेच प्राथमिक चौकशी अहवाल व पोलीस अधीक्षकांनी लेखी प्राधिकार पत्र दिल्यावरून सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांच्या फिर्यादीवरून सखाराम गंगाधर दळवी, श्रीराम सतीशभाऊ सोमाणी, तत्कालीन ठाणे अंमलदार पोलीस हवालदार एस.एस. पठाण (सेवानिवृत्त), तपासीक अंमलदार पोलीस हवालदार के.डी. पोटे (सध्या उपनिरीक्षक, हिंगोली ग्रामीण) याचेविरूद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस उप निरीक्षक ए.एस. पठाण करीत आहेत.