वाहनांना प्रवासी मिळेना, हप्ते फिटेनात, उपसमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:29 AM2021-05-23T04:29:03+5:302021-05-23T04:29:03+5:30
हिंगोली : प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी प्रकारातील वाहनचालकांवर कोरोनाचे संकट मोठा आघात करणारे ठरत आहे. एकतर ई पास मिळत ...
हिंगोली : प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी प्रकारातील वाहनचालकांवर कोरोनाचे संकट मोठा आघात करणारे ठरत आहे. एकतर ई पास मिळत नसल्याने भाडे नाही, अनेक मालकांनी चालक काढून टाकल्याने उपासमार आली. तर काहींचे हप्ते थकल्याने वाहन फायनान्सवाल्यांनी ओढून नेले. उपासमारीत दिवस काढण्याची वेळ आली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जमापुंजी गमावल्यानंतर नेमकेच सावरत असताना दुसरी लाट आली. या लाटेने खाजगी वाहनानेही लोक प्रवास टाळत आहेत. त्यातच ज्यांना निकडीचे काम आहे, त्यांना ई पास मिळत नसल्याने तसा प्रवास करायचा तर नफ्यापेक्षा जास्त दंडच भरावा लागत असल्याने कोणी तसे वाहन न्यायला तयार नाही. तरीही रोज प्रवासी मिळतील या प्रतीक्षेत जि.प.जवळ पार्किंग करून ग्राहकाची प्रतीक्षा करीत शेकडो वाहने उभी राहात आहेत. त्यातही एक ते दोन लिटर डिझेल, पेट्रोल वाया जात आहे. शिवाय ज्यांचे हप्ते थकले अशांना एकतर रोज फायनान्स कंपनीचे बोलणे ऐकावे लागत असून काहींची वाहने ओढून नेली. वरून बाहेर पडल्यावर चहापान्यालाही रक्कम खिशात नसल्याने कुणी ओळखीचे भेटले तर खाली पाहण्याची वेळ येत आहे. काही वाहनचालकांचे पोटच या कामावर असल्याने अशांना वर्गणी करून माल भरून दिल्याचे सांगताना एका वाहनचालकास गहिवरून आले होते. विशेष म्हणजे आम्ही दुर्लक्षित घटक असल्याने कोणतीच मदत आम्हाला मिळाली नाही. हात पसरायची ईच्छाही नाही. मात्र तपासणी करून निकडीच्या काळात ईपासद्वारे लोकांना प्रवास करायला मुभा दिली तरीही आम्ही आमचे जीवन जगू शकू, असे स्वाभिमानाचे बोलही एका चालकाने बोलून दाखविले. त्यातच वाहन बंद पडले तर दुरुस्तीची अडचण होत असल्याचेही सांगण्यात आले.
वाहनेही बंद, गॅरेजलाही दुरुस्ती येईना
एकतर वाहने बंदच असल्याने त्यांची दुरुस्ती निघत नाही. जर दुरुस्ती निघालीच तर सुटे भाग मिळण्यासाठी दुकाने सकाळीच एक दिवसाआड सुरू राहात असल्याने तोपर्यंत वाहन तसेच ठेवावे लागत आहे. यामुळे अनेकांची गॅरेजचालकावर नाराजी येत आहे.
वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर
ज्यांचे स्वत:चे वाहन नाही. दुसऱ्याच्या वाहनावर आहेत. अशा अनेकांचा रोजगार गेला. दुसरे कामही मिळत नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ येत आहे, असे वाहनचालक संघटनेचे संतोष डुकरे म्हणाले. शिवाय ज्यांना मालकांनी अजूनही कायम ठेवले त्यांना ग्राहकच नसल्याने पगार कसे द्यायचे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
वाहने पार्किंगमध्येच
मागील दोन महिन्यांपासून वाहनाला एकदाही भाडे लागले नाही. पार्किंगमध्ये वाहन उभे करून परत नेण्यात डिझेल वाया जात आहे. ई पास मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
-ज्ञानेश्वर गिरी
मागील तीस वर्षांत पहिल्यांदाच चहालाही महाग होण्याची वेळ आली. जीवनाच्या या टप्प्यावर वेगळे कामही करू शकत नाही. कुणाची मदत मिळणार नाही. मात्र ई पास दिली तर आम्ही जगणे तरी सुकर होईल.
-प्रदीप जयस्वाल
आम्हाला वाहन दुरुस्तीची मुभा दिली. मात्र दुकाने बंद राहात असल्याने पार्ट मिळत नाहीत. काही पार्ट वाहतुकीमुळे मिळत नाहीत. तर त्या तुलनेत वाहनेही दुरुस्तीला येत नाहीत.
-तस्लिम पठाण गफ्फार खान पठाण
चारचाकी वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी पूर्वी वेटिंग असायची. आता आम्हालाच एखादे वाहन येते का याची वाट पहावी लागते. त्यातही सुटे भाग मिळत नसल्याने एकाच दुरुस्तीत दोन तीन दिवस जात आहेत.
-इद्रीस खान
कार ९५००
जीप १८००
दुचाकी १५००००
टॅक्सी/ रिक्षा ४५००
ट्रक/ट्रॅक्टर १४०००
रुग्णवाहिका ५६
शहरात वाहने किती १,९५,००००