हिंगोलीत इंधन दरवाढीमुळे वाहनांची होतेय विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 01:00 AM2018-10-04T01:00:27+5:302018-10-04T01:01:25+5:30
वसमत तालुक्यातील हट्टा येथे इंधन दरवाढीमुळे अवजड वाहनांची विक्री होत आहे. येथील परिसरातील अनेक वाहन मालकांनी इंधन दरवाढीला त्रासून चक्क वाहने विक्रीस काढत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा येथे इंधन दरवाढीमुळे अवजड वाहनांची विक्री होत आहे. येथील परिसरातील अनेक वाहन मालकांनी इंधन दरवाढीला त्रासून चक्क वाहने विक्रीस काढत असल्याचे चित्र आहे.
शासनाकडून इंधन व पेट्रोल दरवाढीचा फटका सर्व सामान्य जनतेला बसत आहे. विशेष म्हणजे या दरवाढीला त्रासून तर वसमत तालुक्यातील हट्टा येथील वाहन मालकांनी वाहने विक्रीस काढली आहेत. सरकारच्या इंधन व पेट्रोल दरवाढीमुळे वाहने विक्री केली जात असल्याची अनेकांनी तशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत. इंधनाचे दर वाढल्यामुळे जादा भाडवाढ मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर वाहन काढणे झाले कठीण झाले. अनेकांनी विविध फायनान्स कंपनीच्या हप्त्यावर वाहने उचलली आहेत. त्यामुळे आता वाहनाचे पैसे कसे फेडावेत, असा प्रश्न भेडसावत आहे.
विशेष म्हणजे शेतकºयांनाही इंधनदरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. शेतीमाल ने-आण करणे, भाजीपाला विक्रीसाठी नेताना भाढेवाढ घेतली जात आहे. त्यामुळे या इंधन दरवाढीमुळे अनेकांचे आर्थिक गणितच कोलडमले आहे. आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शेतकरीही आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीनला उतारा घटल्यामुळे पहिले शेतकरी अडचणीत सापडले आहेत, तर आता दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे मळणीयंत्रवाल्यांना १७० रुपये प्रति पोते घेतले जात असल्याने शेतकºयांना गतवर्षीच्या तुलनेत ४० ते ५० रुपये जास्त मोजावे लागत आहेत. याबाबत मळणीयंत्र चालकाला विचारले असता, इंधन दरवाढीमुळे आम्हालाही दरवाढ करावी लागत आहे, असे सांगितले जात आहे. इंधन दरवाढीला त्रासूनच टेंम्पो विक्रीस काढल्याचे सतिश बारहाते यांनी सांगितले. तर गौतम नाईकवाड म्हणाले इंधन दरवाढ झाली असली तरी, भाडेवाढ मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर वाहन आणावेच का नाही? हा प्रश्न पडला आहे. यासह वाहनधारक खदीर सय्यद, गौस शेख, विठ्ठल बारकर यांच्यासह अनेकांनी वाहने विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे.