पालकमंत्री अब्दूल सत्तार-आमदार नवघरे यांच्यात शाब्दिक चकमक; नियोजन समितीच्या बैठकीत खूर्चीवरून वाद
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: October 28, 2022 06:04 PM2022-10-28T18:04:47+5:302022-10-28T18:05:18+5:30
बैठकीत व्यासपीठावर आमदार नवघरे यांच्यासाठी खूर्चीच नसल्याने ते समोरच्या खुर्चीवर जाऊन बसले होते. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
हिंगोली: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व्यासपीठावरील खुर्चीवरून पालकमंत्री अब्दूल सत्तार व आमदार राजू नवघरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. बैठकीत व्यासपीठावर आमदार नवघरे यांच्यासाठी खूर्चीच नसल्याने ते समोरच्या खुर्चीवर जाऊन बसले होते. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पालकमंत्री अब्दूल सत्तार यांच्यासह आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर सभागृहात दाखल झाले. यावेळी आमदार राजू नवघरे हेही सभागृहात दाखल झाले. मात्र त्यांना बसण्यासाठी व्यासपीठावर खुर्ची नव्हती. यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करून समोर अधिकाऱ्यांसाठी असलेल्या खुर्चीवर जाऊन बसले.
यावेळी पालकमंत्री अब्दूल सत्तार यांनी आमदार नवघरे यांना बैठक दहा वाजता असतांना तुम्ही साडेदहा वाजता आले. जस जसे आमदार आलेत त्या प्रमाणे खुर्चीची व्यवस्था केली असल्याचे म्हणाले. मात्र आमदार नवघरे यांनी आपण दहा वाजताच आलो असल्याचे सांगितले. खुर्चीवरून दोघांत शाब्दिक चकमक उडाली. या प्रकारामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्यांना देखील काय होत आहे कळेनासे झाले होते. पालकमंत्री सत्तार यांनी आमदार नवघरे यांच्यासाठी व्यासपीठावर जागा देण्याच्या सूचना दिल्यानंतर व्यासपीठावर खूर्ची ठेवण्यात आली. त्यानंतरच बैठकीला सुरूवात झाली.
आदित्य ठाकरे म्हणजे छोटा पप्पू -
हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. एका प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणजे छोटा पप्पू असे ते म्हणाले. तसेच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचाही अंब्या असा उल्लेख करून त्यांना विरोधी पक्षनेते पदाचे काहीही कळत नसल्याची टीका त्यांनी केली.