जागेवर उभ्या एस.टी. बस भंगारात जाण्यापासून रोखण्याची राेज कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:00+5:302021-06-04T04:23:00+5:30
हिंगोली : कोरोनामुळे दीड वर्षात मध्यंतरी काही दिवस एस.टी. बसेस धावल्या असल्या तरी जास्त दिवस आगारातच उभ्या आहेत. एकाच ...
हिंगोली : कोरोनामुळे दीड वर्षात मध्यंतरी काही दिवस एस.टी. बसेस धावल्या असल्या तरी जास्त दिवस आगारातच उभ्या आहेत. एकाच जागेवर बसेस उभ्या ठेवून खराब होऊ नये म्हणून आगार प्रशासनाकडून रोज त्यांची देखभाल केली जात आहे. यासाठी पूर्ण क्षमतेने कर्मचारी वर्ग कामाला लावला आहे.
कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून एस.टी. बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मध्यंतरी पूर्ण क्षमतेने बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येही एस.टी. बसेस बंद ठेवाव्या लागल्या. केवळ मालवाहतूक ट्रकवरच आगाराची मदार होती. आताही पूर्ण क्षमतेने बस सुरू झाल्या नाहीत. दीड वर्षात मध्यंतरीचा काळ वगळला तर एस.टी. बसेस आगारात उभ्या करून ठेवण्याची वेळ आगार प्रशासनावर आली. एकाच जागेवर बस उभी राहिल्याने ती नादुरुस्त राहण्याची शक्यता जास्त असते. ऐन प्रवासी वाहतुकीच्या काळात धावपळ होऊ नये, यासाठी आगार प्रशासनाने एस.टी. बसेस दुरुस्तीसाठी कर्मचारी वर्ग पूर्ण क्षमतेने कामाला लावला आहे. दररोज किमान एक तरी फेरी मारून बस चांगल्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र हिंगोली आगारात पाहावयास मिळाले.
फक्त दीड महिना धावली नाही एसटी
जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एस.टी.ची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे हिंगोली आगारालाही दीड महिना प्रवासी वाहतूक बंद ठेवावी लागली. या काळातही एस.टी. बसेसची नियमित देखभाल-दुरुस्ती ठेवली जात असल्याची माहिती हिंगोली आगारातून देण्यात आली.
जिल्ह्यातील एकूण आगारे - ३
एकूण बसेस संख्या - १४३
कोरोनामुळे बस बंद असल्या तरी बसेसची नियमित देखभाल-दुरुस्ती केली जाते. दररोज प्रत्येक बसची एक तरी फेरी मारून बस चांगल्या स्थितीत आहे की नाही, हे पाहिले जात आहे.
- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली
बॅटरी दुरुस्ती
हिंगोली आगारात पाहणी केली असता एका शिवशाही बसची बॅटरी चांगल्या स्थितीत आहे की नाही, हे कर्मचारी पाहत होते. बस बंद असल्याने बॅटरी उतरण्याचे प्रमाण वाढले आहे. बॅटरी चार्जिंग करून ठेवली जात आहे.
चाकांची दुरुस्ती
बस एकाच जागेवर उभी ठेवल्याने चाके जॅम होणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. प्रत्येक बसची चाके काढून ऑईल, ग्रीस लावून पुन्हा बसविली जात असल्याचे चित्र हिंगोली आगारात पाहावयास मिळाले.
दरवाजाचे लॉक जॅम
एस.टी. बसेसची दिवसातून एखादी तरी फेरी मारली जात असली तरी दरवाजे मात्र कायम बंद आहेत. यामुळे दरवाजाचे लॉक जॅम होऊन दरवाजे उघडण्यास अवघड जात आहेत. त्यामुळे अशा दरवाजाच्या लॉकलाही ग्रीस लावले जात आहे.
एअर फिल्टरची साफसफाई
बंद असलेल्या बसेसची एअर फिल्टरची साफसफाई केली जात आहे. अनेक बस बंद असल्याने एअर फिल्टरमध्ये कचरा जाऊन बसेस नादुरुस्त होणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे.