ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल अनंतात विलिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 04:28 PM2018-10-12T16:28:20+5:302018-10-12T16:30:35+5:30
मराठवाड्याचे भूमिपुत्र ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल (96) यांचे वृद्धपकाळाने गुरूवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर आज वसमत येथील शासकीय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
वसमत (हिंगोली ) : मराठवाड्याचे भूमिपुत्र ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल (96) यांचे वृद्धपकाळाने गुरूवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर आज वसमत येथील शासकीय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विनोद अग्रवाल यांनी त्यांना मुखाग्नी दिला.
महात्मा गांधी आणि विनोबाच्या विचारणा आयुष्य समर्पित करणारा लढवय्या आणि वसमत च्या शिरपेचातील हिरा असलेले मराठवाड्याचे गांधी म्हणून आपली ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ सर्वोदयी नेते गंगाप्रसाद अग्रवाल यांना हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित अखेरचा निरोप देण्यात आला. स्वानंद कॉलनी येथील त्यांचे राहते घरून सकाळी 11 वाजता अंत्ययात्रा निघाली.
शहरातून काढलेल्या या अंत्ययात्रेदरम्यान शहरवासीयांनी पुष्पाच्या पाखळ्यांचा वर्षाव केला. यावेळी शहरातील शाळा महाविद्यालये , बाजारपेठ ही दुपारपर्यंत बंद ठेवून गंगाप्रसादजी यांच्या अंत्ययात्रेत शहरातील सर्व नागरिक व्यापारी तसेच मराठवाड्यातून आलेल्या त्यांच्या चाहत्यांनी, अनुयायींनी आणि त्यांच्या सहवासात हयात घातलेल्या अनेकांनी शोकाकुल वातावरणात त्यांना कोठा रोडवरील शासकीय इतमामात गंगाप्रसादजी अमर रहे ! चा जयघोष करीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
दरम्यान ,त्यांना विविध पक्ष, सामाजिक संघटना, सर्वोदय चळवळीतील नेत्यांनी आपल्या भाषणातून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांची नात वनिता अग्रवाल यांना गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले.मराठवाड्याची गांधीवादी दीपस्तंभ नेतृत्व अनंतात विलीन झाल्याने वसमत सह मराठवाड्यात शोककळा पसरल्याच्या भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या.
गांधी विद्यालयाच्यावतीने दरवर्षी सर्वोदय मंडळातील कार्यकर्त्यांचा दरवर्षी याच दिवशी मेळावा घेऊन त्यांचे विचार पेरण्याचे काम करणार
- अॅड . रमेश आंबेकर
वसमत नगरीच्या शिरपेचातला हिरा निखळला हे जीवन समाजासाठीच गेले. आंदोलन म्हणजेच प्रसाद जी अशी भूमिका घेऊन ते जगले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- डॉ. व्यंकटेश काब्दे
मराठवाड्याच्या बाहेरी त्यांचे मोलाचे कार्य असून बोदवड अग्रवाल समाजाला मोठे उद्बोधक म्हणून ते प्रेरणादायी ठरले.
- राकेश अग्रवाल.
प्रसाद जिनी जीवनभर संघर्ष करून समाजाला खूप काही दिले त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली.
- सदाशिवराव पाटील, नांदेड
वसमत चे नावलौकिक करणारे गांधीवादी विचाराचे महान कर्तत्व आमच्यातून गेल्याने समाजाची मोठी हानी झाली.
- डॉ. एम.आर. क्यातमवार
शेतकऱ्यांसह मजूरदार, दीनदुबळे व मागास घटकांना दिशा देण्यासाठी प्रेरक ठरले.
- ब. ल. तामसकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर यांचा शोक संदेश शिवदास बोड्डेवार यांनी मांडला . स्वातंत्र्य चळवळीतील कीर्तिवंत प्रवाहाचा, समाजवादी विचाराच्या प्रेरणा ज्योतीचा अंत झाला. त्यामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली.काका जींनी समाज व देशासाठी संपूर्ण आयुष्य घालविले त्यांच्या जाण्याने गांधीवादी व सर्वोदयवादी विचारात पोकळी निर्माण झाली.
- मोहन जी अग्रवाल, जालना
सर्वोदय विचाराचा महान गांधीवादी विचारवंत आपल्यातून निघून गेल्याने सूर्य मळवली यासारखा अंधार झाला.
- डॉ. अशोक बेलफोडे