आठवड्यात दोघांचा बळी, तरीही बाजारपेठेतील गर्दी हटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:43 AM2021-02-26T04:43:14+5:302021-02-26T04:43:14+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी २४ रुग्ण आढळून आले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात ...
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी २४ रुग्ण आढळून आले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात दोघांचा मृत्यू झाला तरी नागरिकांना अजूनही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. लग्न समारंभासह धार्मिक कार्यक्रमांमध्ये गर्दी कायम राहत आहे त्यामुळे तीन दिवसांतील कोरोना रुग्णांचा आकडा शंभराजवळ पोचला आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट घेतली जात आहे. हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव परिसरात जवळपास १०४ जणांची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट घेतली असता कळमनुरी परिसरात कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. तसेच हिंगोली व सेनगाव परिसरातील काही संशयितांची तपासणी केली असता यामध्ये हिंगोली परिसरात २२, तर सेनगाव परिसरात एक रुग्ण आढळून आला आहे. विशेष म्हणजे हिंगोली येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या सावरकरनगरातील ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणारे दहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ५ झाली असून, त्यापैकी ३ हजार ७७४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला १७१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान, जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनातर्फ ठोस कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. रात्रीला संचारबंदी लागू केल्यानंतरही काही भागांत नागरिक खुलेआम फिरत असल्याचे चित्र आहे. काही व्यापारी ग्राहकांमध्ये फिजिकल डिस्टन्स राहावे, यासाठी दुकानापुढे चौकोन तयार करीत असले तरी शहरात कन्टेन्मेंट झोन जाहीर केलेल्या भागातील दुकानेही सुरू असल्याचे गुरुवारी पहावयास मिळाले. तसेच नागरिकांची गर्दी कायम राहत असल्याने कोरोनाचा धोका घट्ट होत आहे.
परवानगीसाठी नागरिक त्रस्त
जिल्ह्यात रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. लग्न समारंभासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेकांनी लग्न सोहळे आयोजित केले होते. आता लग्न सोहळे आयोजित करणाऱ्या पित्यांची मोठी पंचाईत झाली आह. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीसाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे अनेक जण परवानगी न घेताच लग्न सोहळे उरकत आहेत. त्यात ग्रामीण भागासह शहरातही धार्मिक कार्यक्रमांना शेकडोंची गर्दी राहत आहे. ही गर्दी कमी करण्यात प्रशासनाला अद्याप यश आले नसल्याचे चित्र आहे.