गोरेगावात आजी-माजी आमदारांच्या पॅनेलचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:50+5:302021-01-19T04:31:50+5:30
सेनगाव : तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी लागला. पोलीस प्रशासनाने यावेळी पुरेसा बंदोबस्त ठेवला होता. सेनगाव येथील जिल्हा ...
सेनगाव : तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी लागला. पोलीस प्रशासनाने यावेळी पुरेसा बंदोबस्त ठेवला होता. सेनगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये मतमोजणी पार पडली. गोरेगावात दोन्ही माजी आमदारांच्या पॅनेलने बाजी मारली. पानकनेर गावात माजी सभापती संजय देशमुख यांचे पॅनेल तर कवठा ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायकराव देशमुख यांच्या पॅनेलचा पराभव झाला.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीकरिता सेनगाव पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला होता. शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर प्रत्येक फेरीतील उमेदवारांना मोबाईलसह अन्य साहित्य बाहेर काढून आत प्रवेश देण्यात आला. पास असणाऱ्या उमेदवारांना आतमध्ये मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली. तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींची मतमोजणी एकूण २० टेबलवर १३ फेऱ्यांमध्ये करण्यात आली. यावेळी विजयी झालेले उमेदवार मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यामुळे पोलिसांना लाठीचार्जसुध्दा करावा लागला. सेनगाव तालुक्यातील गोरेगावात माजी आमदार भाऊराव पाटील व साहेबराव पाटील यांच्या पॅनेलने १० जागांवर विजय मिळवला. तर त्यांना मोठे आव्हान निर्माण करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य संजय कावरखे, डॉ. रवींद्र पाटील यांच्या पॅनेलला सात जागांवर समाधान मानावे लागले. कवठा येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायकराव देशमुख यांच्या पॅनेलचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यांचा ताब्यात असलेली ग्रामपंचायत भाजपच्या पॅनेलने ताब्यात घेतली तर पळशी येथे जिल्हा परिषद सदस्य खिल्लारी यांच्या पॅनेलने ९ पैकी ९ जागांवर विजय मिळवला. पुसेगाव येथे सेनेने आठ जागांवर विजय मिळवला. जयपूर ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून, येथे प्रहारने बाजी मारली. साखरा, हत्ता, कापडसिगी, जामदया, उमरदरी, चिखलाकर आदी ग्रामपंचायतींवर काॅंग्रेसने विजय मिळवल्याने काँग्रेसच्या नेत्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे. तर पानकनेरगाव येथे माजी शिक्षण सभापती संजय देशमुख यांच्या पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. वरुड चक्रपान येथे डॉ. माणिकराव देशमुख यांच्या पॅनेलने आपले वर्चस्व कायम ठेवले. याठिकाणी माजी संचालक कांतराव कोटकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी आनंद साजरा केला. मतमोजणीची प्रक्रिया तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.