Video: हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयातील व्हीसी रूमला भीषण आग
By विजय पाटील | Published: November 22, 2023 02:30 PM2023-11-22T14:30:34+5:302023-11-22T14:31:12+5:30
हिंगोली जिल्हा परिषदेच्या अभ्यागत कक्षामागे असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स रूममध्ये दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली.
हिंगोली: जिल्हा परिषदेतील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूमला लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने अल्पावधीतच हे आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या अभ्यागत कक्षामागे असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स रूममध्ये दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागण्याचा अंदाज आहे. या आगीमध्ये या हॉलमधील फर्निचरसह व्हिडिओ कॉन्फरन्स यंत्रणा पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या ठिकाणी एक मोठी स्क्रीन, इंटरनेट यंत्रणा, माइक यंत्रणा तसेच बॅटऱ्या व इतर उपकरणे होती. गरजेच्या वेळीच या रूममध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वावर असतो. आज कोणत्याही काम नसल्याने ही खोली बंद होती.
दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक धुराचे लोट व आवाज झाल्याने ही आग लक्षात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेतील कर्मचारी तत्काळ आवारात दाखल झाले. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले यानंतर लागलीच कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या अग्निशामक पथकाला पाचारण केले. या पथकाने अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली. या आगीचा फटका इतर विभागांना बसला नसला तरीही वृत्तही लिहीपर्यंत नेमके नुकसान किती याचा अंदाज आला नव्हता.
हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयातील व्हीसी रूम भीषण आगीत खाक #hingolipic.twitter.com/6YT2bVOwc9
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) November 22, 2023
याठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, आत्माराम बोंद्रे, गणेश वाघ, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिगंबर माडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शेळके आदींनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढून आग आटोक्यात आणण्यासाठी उपाय योजनेसाठी प्रयत्न केले. अग्निशामक दल दाखल झाल्यानंतर मुख्याधिकारी अरविंद मुंडे पोलीस निरीक्षक विकास पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या आगीचे वृत्त कळताच बघ्यांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.