Video: अलौकिक! आकाशात अवतरले इंद्रधनुष्याचे रिंगण; शहर काहीवेळासाठी स्तब्ध
By यशवंत भीमराव परांडकर | Published: August 2, 2024 06:28 PM2024-08-02T18:28:49+5:302024-08-02T18:36:50+5:30
लहान-मोठ्यांनी रंगेबेरंगी इंद्रधनुष्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
- इस्माईल जहागिरदार
वसमत: मागच्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असून वातावरणही काहीवेळ ढगाळमय राहत आहे. शुक्रवारी एक वाजेदरम्यान आकाश निरभ्र राहताच इंद्रधनुष्याचे रिंगण पहायला मिळाले. त्यावेळी लहान-मोठ्यांनी रंगेबेरंगी इंद्रधनुष्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
शहरात २ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेदरम्यान आकाश निरभ्र राहिले. तबकडी सारखे आणि रंगेबेरंगी असे चित्र पाहून अनेकांना कौतुक वाटत असतानाच तो इंद्रधनुष्य आहे याची खात्री पटली. त्यामुळे अनेकांनी आपल्या घराच्या गच्चीवर, उंच टेकडीवर जावून इंद्रधनुष्य कॅमेऱ्यात कैद करणे सुरु केले. जवळपास १० ते १५ मिनिटे हे इंद्रधनुष्याचे दृश्य नागरीक कुतुहलाने पाहत होते. अनेकांनी इंद्रधनुष्याची हालचाल व्हिडीओ तयार करुन इतरांना पाठविला. सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल होताच शहरातील चौक, बसस्थानक परिसर, परभणी रोड, मुख्य बाजारपेठ आदी ठिकाणी युवकांनी इंद्रधनुष्याचा व्हिडिओ व्हायरल करणे सुरु केले.
अलौकिक! आकाशात अवतरले इन्द्रधनुष्याचे रिंगण, वसमत शहरातील दृश्य #rainbowcircle#hingolinewspic.twitter.com/d29lJZ7gMY
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 2, 2024
‘इंद्रधनुष्या’ मुळे शहर दहा मिनिटे झाले स्तब्ध...
वसमत शहर हे हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यांच्या मुख्य रस्त्यांवर आहे. त्यामुळे वाहनांचा गोंगाट नेहमीच ऐकायला मिळतो. परंतु २ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेदरम्यान मात्र शहर एकदम स्तब्ध राहिले. आपल्या शहरात काय होत आहे हे नातेवाईकांना कळावे म्हणून युवकांनी काही क्षणातच इंद्रधनुष्याचे लाईव्ह देखावा मोबाइलमध्ये कैद केला व व्हॉटस्अपद्वारे पाठवून देत होते.