Video:"...रट्टे द्यायला लावीन बरं", आमदार संतोष बांगरांचा महावितरणच्या कर्मचाऱ्याला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 07:53 PM2022-11-25T19:53:23+5:302022-11-25T19:54:34+5:30
काही दिवसांपूर्वीच आ. संतोष बांगर यांनी मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्याला शिविगाळ केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे वाद निर्माण झाला होता.
हिंगोलीः शासकीय कर्मचाऱ्यास फोन वरून धमकी देत असल्याचा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोन करून इकडची लाईन तोडू नका, नाहीतर रट्टे देईन, अशा भाषेत उघड धमकी दिल्याने आ. बांगर यांचे नाव आणखी एका वादात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच आ. संतोष बांगर यांनी मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्याला शिविगाळ केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यापूर्वी आ. बांगर यांनी एका शासकीय कर्मचाऱ्यास कानाखाली मारली होती. आता ते नव्या वादात अडकले आहेत. थकीत बिल असणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सध्या महावितरणने हाती घेतली आहे. यामुळे काही ग्रामस्थांनी वीज कनेक्शन तोडल्याची तक्रार आ. बांगर यांच्याकडे केली. यावर आ. बांगर यांनी लगेच महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोन करून दमदाटी केली. इकडची लाईन तोडू नका, नाहीतर रट्टे देईन, अशा शब्दांत बांगर यांनी उघड धमकीच दिली. बांगर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फोनवरून असा झाला संवाद
लाईन कोणी तोडली रे, पवार तू कुठला आहे?. औंढा येथील असून तुला कळत नाही का? दुसरे कोणी असत तर रट्टे द्यायला लावीन बर. तुम्हाला सांगितलं होते लाईनला हात नाही लावायचा. यावर कर्मचारी साहेबांनी तोडण्यास सांगितल्याचे उत्तर देतो. त्यानंतर आ. बांगर त्यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर घेतात.
आ. बांगर आणि वाद
कर्मचाऱ्यांना धमकावणे, शिविगाळ आणि मारहाण करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. यापूर्वी त्यांनी पीक विम्याच्या मुद्यावरून कृषी अधीक्षकांनाही शिविगाळ केली होती. मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्याला शिविगाळ केल्याचे प्रकरण ताजेच आहे. तसेच मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना जेवणाचे डबे पुरवणाऱ्या गोडाऊनच्या व्यवस्थापकाला तर त्यांनी कानाखाली मारली होती.