पूर्णा तालुक्यात अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी२६ गावांत दक्षता समित्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:25 AM2018-01-20T00:25:26+5:302018-01-20T00:28:17+5:30
अवैध वाळू वाहतुकीला चाप बसविण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार तालुक्यातील २६ वाळू घाटांसाठी २६ गावांमध्ये ग्राम दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे़ त्यामुळे येथील वाळू उपस्यावर या समितीचे लक्ष राहणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : अवैध वाळू वाहतुकीला चाप बसविण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार तालुक्यातील २६ वाळू घाटांसाठी २६ गावांमध्ये ग्राम दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे़ त्यामुळे येथील वाळू उपस्यावर या समितीचे लक्ष राहणार आहे़
पूर्णा तालुक्यातून वाहणाºया गोदावरी व पूर्णा नदी पात्रात २६ ठिकाणी वाळू घाट आहेत़ यामध्ये गोदावरी नदीवर १९ तर पूर्णा नदीवर ७ घाटांचा समावेश आहे़ धनगर टाकळी, पिंपळगाव लिखा, कळगाव, बाणेगाव, महागाव, कान्हडखेड, कंठेश्वर, मिठापूर, सातेगाव, धानोरा मोत्या, पेनूर, धानोरा काळे, गोळेगाव, मुंबर, पिंपळगाव बाळापूर, कौडगाव, वझूर, खरबडा, देवठाण, देऊळगाव दुधाटे, उक्कडगाव, कान्हेगाव, सदलापूर या वाळू घाटातून रात्र-दिवस वाळू उपसा केला जात आहे़ यामधून शासनाचे लाखो रुपयांचे नुकसानही होत आहे़ महसूल व पोलीस प्रशासन वाळू उपस्यावर निर्बंध घालण्यासाठी समितीची स्थापना करून कारवाईही करीत आहे़ परंतु, रात्रीच्या वेळी वाळू उपसा होत असल्याने माफिया चांगलेच गब्बर झाले आहेत़ विविध उपाययोजना करूनही वाळू उपस्यावर रोख लावण्यात प्रशासन कुचकामी ठरत आहे़ त्यामुळे शासनाने वाळू घाटाच्या ठिकाणी ग्राम दक्षता समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे़ ग्रामसेवक व सरपंच यांना याबाबतचे अधिकारही बहाल केले आहेत़ तसेच वाळू धक्क्यातून वाहतूक करणाºया वाहनांची तपासणीही या समितीला करता येणार आहे़ या संदर्भात ग्राम दक्षता समितीची स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ पूर्णा तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, तालुक्यातील २६ वाळू घाटांच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्राम दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे़
त्या त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची अध्यक्षपदी निवड केली आहे़ या समितीमध्ये ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी आदींचा समावेश असल्याचे महसूल विभागातून सांगण्यात आले़