‘प्रहार’चा जिल्हाध्यक्ष बनावट नोटा प्रकरणात ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 01:57 PM2020-09-08T13:57:21+5:302020-09-08T14:01:22+5:30
हिंगोलीच्या बनावट नोटांच्या प्रकरणात हिंगोली शहर ठाण्याच्या पथकाने पांढरकवडा येथून ताब्यात घेतले आहे.
हिंगोली : बनावट नोटांच्या प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील पुसदनंतर पांढरकवडा कनेक्शनही समोर येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या पांढरकवडा-वणी जिल्हाध्यक्ष विलास पवार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काल रात्री पवारला हिंगोलीत आणले असून चौकशी सुरू आहे.
संतोष सूर्यवंशी याचे पवारशी असलेले मैत्रिपूर्ण संबंध असल्याचे पोलिसांना तपासादरम्यान आढळून आले आहेत. तर पवारवरही विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरीच्या एका प्रकरणातही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तर शस्त्र कायद्यान्वयेही तेथे गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जाते. विलास पवार हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील असून सध्या पांढरकवडा येथे स्थायिक झाला आहे. वाळूतस्करी, कथित ‘सीए’ची ३५ लाखांची फसवणूक व एक कोटीच्या अन्य एका प्रकरणासह बनावट पदव्यांच्या प्रकरणातही नाव चर्चेत होते. या विलासला आता हिंगोलीच्या बनावट नोटांच्या प्रकरणात हिंगोली शहर ठाण्याच्या पथकाने पांढरकवडा येथून ताब्यात घेतले आहे.
हिंगोलीत ३ सप्टेंबर रोजी आनंदनगर भागात एका शिक्षकाच्या घरी खोली भाड्याने घेवून बनावट नोटांचा छापखाना सुरू केल्याचे उघड झाले होते. या ठिकाणी१00, २00, ५00, २000 रुपयांच्या १७ लाखांच्या बनावट नोटांसह प्रिंटर, १३ महालक्ष्मी मूर्ती, स्कॅनर, चारचाकी वाहन जप्त केले होते. शिवाय संतोष सूर्यवंशी, छाया भुक्तर यांनाही ताब्यात घेतले होते. नंतर पुसदच्या शेख इम्रान व विजय कुरुडेला अटक केली होती. विलास पवारचा या प्रकरणात थेट सहभाग आहे की, नोटांचा विनियोग करण्यात मदत करीत होता? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत विचारले असता उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने म्हणाले, विलास पवारला काल ताब्यात घेतले. रात्री येथे आणले आहे. सध्या चौकशी करीत आहोत. त्यांचे कनेक्शन असले तरीही नेमके काही हाती लागते काय? याचा शोध घेतला जात आहे.