कयाधू नदीवर पूल उभारणीसाठी गावकऱ्यांचे नदीपात्रात उतरून आंदोलन
By विजय पाटील | Published: October 3, 2023 06:08 PM2023-10-03T18:08:36+5:302023-10-03T18:09:12+5:30
कयाधू नदीला पूर आला की, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील कोंढूर ते डिग्रस येथून जाणाऱ्या कयाधू नदीवर पूल बांधावा, या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी ३ ऑक्टोबर रोजी कयाधू नदीच्या पाण्यात उतरून दोन तास आंदोलन केले.
कयाधू नदीवर पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे कयाधू नदीच्या पलीकडे कोंढूर ते डिग्रस गावांतील शेतकऱ्यांची पाचशे ते सहाशे हेक्टर जमीन आहे. सदरील जमीन विहितीसाठी फेरा मारून जावे लागत आहे. नदीवर पूल बांधावा, यासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आलेली आहेत. परंतु या आंदोलनाला अद्यापपर्यंतही यश आले नाही. कयाधू नदीला पूर आला की, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
कयाधू नदीवर पूल झाल्यास दहा ते पंधरा गावांतील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. कळमनुरी व आखाडा बाळापूरला जाण्या-येण्यासाठी फेरा मारून जावे लागत आहे. या आंदोलनात कोंढूर ,डिग्रस, गोरलेगाव, सिंदगी, येहळेगाव (गवळी), असोला, कसबे धावंडा आदी गावांनी पाठिंबा दिला. शेतकरी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कयाधू नदीपात्रात उतरून दोन तास आंदोलन केले. विविध मागण्यांचे निवेदन मंडळअधिकारी तेलेवार यांना देण्यात आले. यावेळी विनोद बांगर, विठ्ठल देशमुख, विद्याधर मगर, राजू पतंगे, मारोती पतंगे, ज्ञानेश्वर पतंगे, सुधाकर पतंगे, काशिराव पतंगे, विठ्ठल पतंगे, उत्तमराव पतंगे आदींची उपस्थिती होती.