ग्रामस्थांनी सरपंचाला मारहाण करणाऱ्या तलाठ्यांला दिला बेदम चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 06:53 PM2021-04-21T18:53:36+5:302021-04-21T18:53:53+5:30
तलाठी तालुक्याच्या ठिकाणी येत नसल्याने दुष्काळी अनुदानाच्या अडचणीने शेतकरी त्रस्त होते.
सेनगाव: सततची अरेरावी व शिवराळ भाषा वापरणाऱ्या तालुक्यातील तादुंळवाडी येथील तलाठ्यांने सरपंचाला शिविगाळ करीत मारहाण केल्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकाराने संतापलेला ग्रामस्थांनी एकत्र येवून साेमवारी तलाठ्यांला बेदम चोप दिला आहे. या हाणामारीच्या घटनेतील सरपंच व तलाठी दोघेही उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत.
सेनगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथील तलाठी जांबूतकर हे मागील काही दिवसांपासून गावात येत नव्हते. तलाठी तालुक्याच्या ठिकाणी येत नसल्याने दुष्काळी अनुदानाच्या अडचणीने शेतकरी त्रस्त होते. यामुळे गावातील सुरेश धनवे यांनी तलाठ्यांना सातत्याने फोन लावत असल्याने सोमवारी सायंकाळी जांबुतकर गावात आले. यावेळी दुष्काळी अनुदानाच्या अडचणी व अनुदान न मिळालेले शेतकरी मोठ्या संख्येने गोळा झाले होते. याप्रसंगी काही शेतकऱ्यांच्या दुष्काळी संमतीवरुन तलाठी जांबुतकर हे शेतकऱ्यांना अपमानास्पद भाषेत बोलत हाेते. यावेळी सरपंच धनवे यांनी जांबुतकर यांना चांगला भाषेत बोलण्याचे सांगितले. त्यातूनचं सरपंच व तलाठ्यांची शाब्दिक बोलाबोली झाली. याप्रसंगी तलाठ्यांने सरपंचांचा अंगावर धावून जात थापट बुक्काने मारहाण केली, यामुळे एकच गोंधळ उडाला.
तलाठ्याने थेट सरपंचाला मारहाण केल्याने उपस्थितांसह सर्व गाव गोळा हाेत तलाठ्यांला ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. ग्रामस्थ ऐवढावरचं न थांबता तलाठ्यांला कोंडून ठेवले. या घटनेची माहिती सेनगाव पोलिसांना मिळाल्यानंतर तासाभरानंतर तलाठी जांबुतकर यांची ग्रामस्थांचा तावडीतून सुटका केली. या मारहाणीतील जखमी झालेले सरपंच धनवे व तलाठी जांबुतकर हे दोघेही उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सेनगाव पोलीस ठाण्यात या घटनेसंबंधी नाेंद करण्यात झाली नव्हती.