ग्रामस्थ-वनविभाग संघर्ष पेटला; अतिक्रमण काढताना ग्रामस्थांकडून दगडफेक; पथकाचा हवेत गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 07:44 PM2022-01-05T19:44:54+5:302022-01-05T19:45:46+5:30
अतिक्रमण आजच काढणार असल्याचे लक्षात येताच दगडफेक सुरू झाली. त्यानंतर पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला.
हिंगोली : तालुक्यातील पातोंडा येथे वनविभागाच्या ११ हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वन व पोलिसांच्या संयुक्त पथकावर ग्रामस्थांनी दगडफेक केल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. तरीही जमाव पांगत नसल्याने वन अधिकाऱ्यांनी तीनदा हवेत गोळीबार केल्याची घटना ५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. यात ११ वन अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून ५० शेतकरीही जखमी झाले.
पातोंडा येथील वनजमिनीवर अतिक्रमण केल्याने ११ शेतकऱ्यांना वनविभागाकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. २२ डिसेंबर, २८ डिसेंबरला नोटिसा देवून पुन्हा १ जानेवारीला नोटिसा तामिल केल्या होत्या. २ जानेवारीपासून अतिक्रमण काढण्यात येईल, असे नोटिसीत म्हटले होते. त्यानंतर हे अतिक्रमण हटविण्यासाठी वन विभाग व अतिक्रमणधारकांसह ग्रामस्थांची बैठक २ जानेवारीला झाली. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मालकीचे काही पुरावे असल्यास सादर करण्यास सांगण्यात आले. ४ जानेवारीला पुरावे सादर करण्यासाठी पुन्हा बैठक झाली. ५ रोजी वन व पोलीस प्रशासनातील कर्मचारी मशिनसह दाखल झाले तेव्हा ग्रामस्थ तेथे जमले. अतिक्रमण आजच काढणार असल्याचे लक्षात येताच दगडफेक सुरू झाली. त्यानंतर पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला. मात्र जमाव आक्रमक होत असल्याने शेवटी वन अधिकाऱ्यांनी तीन वेळा हवेत गोळीबार केल्याने जमाव पांगला. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, वसमतचे विनोद जांभुळे हेही जखमी झाले. शिवाय ९ कर्मचारीही जखमी असून यात एक महिला कर्मचारी आहे. तर ग्रामस्थांपैकीही जवळपास ५० जण जखमी झाले आहेत.
जखमींपैकी अनेकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रात्री साडेसातच्या सुमारास वन विभागाचे अधिकारी बासंबा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी रवाना झाले होते. याबाबत विचारले असता वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक म्हणाले, अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी बासंबा पोलीस ठाण्यात जाणार आहोत.
या घटनेनंतर सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, वनिवभागाच्या जमिनीवर असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामस्थांना तीनदा संधी दिली. आज प्रत्यक्ष अतिक्रमण हटविताना ग्रामस्थांनी दगडफेक केली. लाठीचार्ज करूनही जमाव पांगत नव्हता. त्यामुळे हवेत गोळीबार करून वन अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ ठरला. वन विभागाचे ११ कर्मचारी व जवळपास तेवढेच ग्रामस्थ जखमी झाले आहेत. अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर गुन्हा नोंद केला जाणार आहे.