शिक्षकांची बदली झाल्याने बरडा-पिंपरीची शाळा भरली थेट हिंगोली जिल्हा परिषदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 06:12 PM2018-11-26T18:12:29+5:302018-11-26T18:17:10+5:30
यामुळे शाळेत केवळ एकच शिक्षक असल्याने ग्रामस्थांनी आज थेट हिंगोली जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच विद्यार्थांची शाळा भरविली.
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील बरडा पिंपरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन शिक्षकांची दिवाळीत बदली झाली. यामुळे शाळेत केवळ एकच शिक्षक असल्याने ग्रामस्थांनी आज थेट हिंगोली जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच विद्यार्थांची शाळा भरविली.
बरडा पिंपरी या गावात जिल्हा परिषदेची एक ते पाच वर्गापर्यंत शाळा आहे. जवळपास 100 च्या वर विद्यार्थी या शाळेत शिकतात. येथे तीन शिक्षक कार्यरत होते. यातील दोन शिक्षकांची बदली दिवाळीत झाली. त्यामुळे येथील शाळेत तात्काळ शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी केली.
याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच ग्रामस्थ पालक उपस्थित होते. जोपर्यंत शिक्षक नियुक्त करण्यात येत नाहीत तोपर्यत शाळेत एकही विद्यार्थी पाठविण्यात येणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.