सामाजिक अंतर नियमाचा भंग; हिंगोलीतील चार बँक शाखा व्यवस्थापकांची पोलिसांकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 02:52 PM2020-05-08T14:52:26+5:302020-05-08T14:59:39+5:30
चारही बँकेचे शाखा व्यवस्थापक हिंगोली शहर ठाण्यात बराच वेळ बसून होते.
हिंगोली : सामाजिक अंतर न पाळल्याने व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत हिंगोली शहरातील चार बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना पोलिसांनी शुक्रवारी चौकशीसाठी बोलावून घेतले.
हिंगोली शहरातील विविध बँकेच्या चार शाखा व्यवस्थापकांना पोलिसांनी शुक्रवारी चौकशीसाठी बोलावून घेतल्याने खळबळ उडाली. या प्रकारामुळे बँकेतील कार्यालयीन कामकाज काहीवेळ बंद ठेवण्यात आले होते. बँक शाखा व्यवस्थापकांना का बोलावले, हा नेमका काय प्रकार सुरू आहे, याबाबत एकच चर्चा सुरू होती. परंतु सोशल डिस्टन्स पाळले जात नाही, शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने बँक शाखा व्यवस्थापकांना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे. चारही बँकेचे शाखा व्यवस्थापक हिंगोली शहर ठाण्यात बराच वेळ बसून होते. परंतु शाखा व्यवस्थापकांना ठाण्यात बोलावून नेल्याने काहीवेळ बँकेतील कामकाज ठप्प होते. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता डीवायएसपी रामेश्वर वैंजणे यांनी दुजोरा दिला. शिवाय याप्रकरणी योग्य ती कार्यवाही केली जाईल असेही त्यांनी सांगितले.