सेनगावात आंदोलनाला हिंसक वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:25 AM2018-08-10T01:25:50+5:302018-08-10T01:26:08+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. शाळेच्या प्रांगणात असलेल्या मिनी स्कूल बससह एक खाजगी वाहन जाळण्यात आले. तर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास पंचायत समितीचे गोदामही जाळले. शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. शाळेच्या प्रांगणात असलेल्या मिनी स्कूल बससह एक खाजगी वाहन जाळण्यात आले. तर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास पंचायत समितीचे गोदामही जाळले. शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती.
महाराष्ट्र बंदच्या काळात सेनगाव येथे आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. अज्ञात व्यक्तीने गुरुवारी रात्रीच्या सुमारास येथील तोष्णीवाल महाविद्यालयाचा प्रांगणात असलेल्या मिनी स्कूल बसला आग लावली. तर एका वाहनाची तोडफोड केली. दुपारी एकचा सुमारास आजेगाव रस्त्यावर एक खाजगी वाहनाला आग लावण्यात आली. ही जीप एका रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची असल्याचे सांगितले जाते. या प्रकारानंतर शहरात तणाव वाढला. आंदोलन चिघळल्याने पोलीस बंदोबस्तही वाढविला होता. या तणावाच्या परिस्थितीत आणखी भर पडली ती पं.स.चे गोदाम जाळण्याच्या घटनेची.
दरम्यान, शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व दुकाने, शाळा, महाविद्यालयासह दवाखाने, मेडिकल, पेट्रोलपंप अशा अत्यावश्यक सेवासह शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका बंद होत्या. सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन स्थळापासून शहरातील प्रमुख मार्गाने रॅली काढून आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देण्यात आला. यावेळी मोठा जमाव एकत्र आला होता. आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर दिवसभर रास्ता रोको केला. त्यामुळे तालुक्यातील प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रास्तारोकोसाठी हिंगोली, रिसोड, जिंतूरसह सर्वच रस्त्यावर झाडे तोडून टाकल्याने वाहतूक पूर्णत: बंद झाली होती.
तालुक्यातील पानकनेरगाव, पुसेगाव, खुडज, भानखेडा, कौठा पाटी, साखरा आदी ठिकाणी रास्ता रोको, बंद पाळण्यात आले. तसेच दोन वाहने जाळण्यात आली.
सेनगाव : सायंकाळी चारच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयाच्या गोदामाला आग लागली. या आगीत शेतीउपयोगी साहित्यासह जुन्या रेकॉर्डला आग लागली. सांयकाळी उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न चालू होते. वाहनांची जाळपोळ, तोडफोड यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लागले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने शहरात पोलिसांच्या वतीने विविध ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. परिस्थिती नियत्रंणात आणण्यासाठी दंगा नियत्रंण पथकास पाचारण केले होते. पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी येथे भेट दिली. आग लागलेल्या गोदामाची तहसीलदार वैशाली पाटील यांनी पाहणी केली.