हिंगोलीत मतांचा टक्का घटला अन् किनवटमध्ये वाढला; कोणाला होईल फायदा?
By विजय पाटील | Published: April 27, 2024 07:00 PM2024-04-27T19:00:39+5:302024-04-27T19:01:20+5:30
सामाजिक ध्रुवीकरणापेक्षा यावेळी मिशन म्हणून काही ठरावीक समाजांनीच मतदान केल्याने जय-पराजयाची गणिते यावरून लावली जात आहेत.
हिंगोली: हिंगोली लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान किनवट विधानसभेत तर सर्वांत कमी हिंगोली विधानसभेत झाले आहे. हिंगोलीत घटलेला मतदानाचा टक्का व किनवटमध्ये वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार? याची चर्चा झाली आहे. सामाजिक ध्रुवीकरणापेक्षा यावेळी मिशन म्हणून काही ठरावीक समाजांनीच मतदान केल्याने जय-पराजयाची गणिते यावरून लावली जात आहेत.
हिंगोली लोकसभेत एकूण ६३.५४ टक्के मतदान झाले. यात वसमत विधानसभा मतदार सं ६२.५४, हदगाव ६५.५३, हिंगोली ५९.९२, कळमनुरी ६३.६०, किनवट ६५.८६ आणि उमरखेड विधानसभा मतदार संघात ६४.३७ टक्के मतदान झाले आहे.उमरखेड विधानसभा मतदारसंघात १ लाख ९६ हजार ७२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. किनवट १ लाख ७७ हजार २५८, -हदगाव १ लाख ९० हजार ३३८, वसमत १ लाख ९४ हजार ८९,-कळमनुरीत २ लाख २ हजार ८४५, हिंगोली १ लाख ९३ हजार ७०० मतदारांनी मतदान केले.संपूर्ण लोकसभेतील २५ पैकी ९ तृतीयपंथियांनी मतदान केले.
हिंगोली लोकसभेत मागच्या वेळीच्या तुलनेत यावेळी तीन टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. यातच हिंगोली विधानसभाच सर्वांत मागे राहिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे दोन प्रमुख उमेदवार ज्या हदगाव विधानसभेतून होते, तो मतदारसंघही दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. त्यामुळे मतदानाची ही वाढ आणि घट कुणाच्या पथ्यावर पडणार आहे, याची चर्चा रंगत आहे. यात सामाजिक गणितांचा आधार लावत कार्यकर्ते आपलाच उमेदवार कसा विजयी होणार आहे, हे सांगत आहेत.
पुरुषांचे दोन, महिलांचे चार टक्के मतदान घटले
२०१९ मध्ये हिंगोली लोकसभेत १७ लाख ३३ हजार ७२९ पैकी ११ लाख ५२ हजार १९५ मतदारांनी मतदान केले होते. तर पोस्टल ६ हजार ५७२ मतदान झाले होते. यात पुरुषांचे ६८.१२ टक्के तर महिलांचे ६४.६४ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे पुरुषांचे दोन टक्क्यांनी तर महिलांचे तब्बल चार टक्क्यांनी मतदान घटले.