तळीरामांची प्रतीक्षा संपणार; हिंगोलीत मद्य विक्रीचे लॉक उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 07:05 PM2020-05-12T19:05:26+5:302020-05-12T19:07:10+5:30
हिंगोली जिल्ह्यात एक दिवसाआड मद्य विक्रीस परवानगी
हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत बंद असलेली मद्य विक्रीची दुकाने आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एक दिवसाआड सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. परवानानिहाय दुकानांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.
राज्य शासनाने १७ मे पर्यंत टाळेबंदी वाढविताना काही बाबींना शिथीलता देण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. यामध्ये मद्य विक्री सुरू करण्यासही अटी व शर्ती टाकून परवानगी दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. घावूक व ठोक विक्रेत्यांसाठी काढलेल्या आदेशात म्हटले की, ग्रामीण भागातील सर्व घावूक विक्रेते यांचे व्यवहार चालू करण्यात येतील. शहरी कंटेन्मेंट झोन वगळुन इतर क्षेत्रातील घावूक विक्रेत्यांचे व्यवहार चालू करण्यात येतील. तथापि सायंकाळी ५ वाजेनंतर व्यवहार सुरू ठेवता येणार नाहीत. शासन निर्देश पाळणे बंधनकारक राहिल. दुकानातील सर्व नोकर व कामगार यांची थर्मल स्कॅनिंग करावी. सर्दी ताप असल्यास त्यांना कामावर ठेवू नये. ५० टक्के मनुष्य बळावर सामाजिक अंतर ठेवून व्यवहार करावेत.
किरकोळ मद्य विक्री दुकानांसाठी दिलेल्या आदेशात म्हटले की, फक्त सीलबंद मद्य विक्री करण्यास परवानगी राहिल. ग्रामीण भागात मॉल्स व्यतीरिक्त सर्व दुकाने सुरू करता येतील. मनपा, न. पा. हद्दीत मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील दुकाने चालू करता येणार नाहीत. तर कंटेनमेंट झोन वगळुन शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ मद्य विक्री दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील उक्त अनुज्ञप्ती सुरू करता येतील. मद्य पिण्याचा प्रमाणित परवाना असल्याशिवाय मद्य विक्री होणार नाही, व रांगेतही उभे राहता येणार नाही. तर जवान व सहाय्यक दुय्यम निबंधक यांना सामाजिक अंतराचे पालन व गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नेमनुकीची जबाबदारी संबंधित कार्यक्षेत्र निरिक्षक व दुय्यम निरीक्षक यांची राहिल. दुकानासमोर पाच पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नये. दोन ग्राहकांत सहा फुट अंतर अनिवार्य आहे. यासाठी आखणी करावी. नोकर व ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावी. सर्दी, खोकला, ताप असल्यास दुकानात प्रवेश देऊ नये. दुकान व परिसर दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहिल. ग्राहकांसाठी हॅन्ड्रप सेनिटायझर उपलब्ध करून द्यावे. लॉकडॉनची मार्गदर्शक तत्वे पाळून आवश्यक मनुष्यबळ नेमावे. खरेदी क्षमतेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी. मद्यविक्री आस्थापने मद्य प्राशन होणार नाही याची काळजी घ्यावी. याशिवाय बॅरिगेटींग, हॅन्डग्लोज, मास्क वापरणे, दर्शनीभागावर फलक, कामकाजाच्या सुधारीत वेळा यासह शासन निर्देश पाळणे बंधनकारक आहे.
अशा असतील वेळा
यामध्ये देशी मद्य किरकोळ विक्री सकाळी ८ ते दुपारी १, देशी, विदेशी मद्य सीलबंद विक्री सकाळी १० ते दुपारी १, बियर व वाईन सीलबंद बाटलीतून विक्री सकाळी १० ते दुपारी १ देशी मद्य ठोक विक्री सकाळी १० ते सायंकाळी ५ व विदेशी मद्य ठोक विक्री सकाळी १० ते सायंकाळी ५ अशा वेळा निश्चित केल्या आहेत. सध्या हे आदेश १४ व १६ मे साठी लागू असणार आहेत.