विक्रीसाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरले; पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 07:02 PM2024-05-17T19:02:09+5:302024-05-17T19:03:10+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त
- इस्माईल जहागीरदार
वसमत : गावठी पिस्तूल व काडतूस अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन फिरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई वसमत तालुक्यातील पळसगाव पाटी जवळ १७ मे रोजी केली. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
पवन माणिकराव डाखोरे (रा. पळसगाव ता. वसमत), गणेश डिगांबर गुंडाळे (रा. रूपला पांढरी ता. पूर्णा ह.मु. पाटीलनगर वसमत) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक वसमत तालुक्यात गस्त घालत होते. यावेळी तालुक्यातील पळसगाव पाटी येथे दोघेजण गावठी पिस्तूल विक्रीसाठी थांबले असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने पळसगाव पाटी गाठून पवन डाखोरे व गणेश गुंडाळे यांना ताब्यात घेतले. यावेळी गणेश गुंडाळे यांच्या मदतीने पिस्तूल व काडतूस विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे पवन डाखोरे यांने पोलिसांना सांगितले. त्याने कमरेला लावलेले एक गावठी पिस्तूल व बॅरेलमधील एक जिवंत काडतूस असा ४२ हजारांचा मुद्देमाल काढून दिला. या प्रकरणी दोघांविरूद्ध वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
दरोड्याचे दोन गुन्हे दाखल
यातील पवन डाखोरे याचेवर नांदेड जिल्ह्यात दरोड्याचे दोन गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार पांडुरंग राठोड, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.