पोत्रा येथे घरांच्या भिंती कोसळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:49 AM2018-02-05T00:49:14+5:302018-02-05T00:49:41+5:30
कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे ४ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास जुन्या जीर्ण चार घरांची मागच्या बाजूची भिंत जमीनदोस्त झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याच भागात गुढ आवाजासह हादरे बसत असल्याने तर्कवितर्क लढविले जात असले तरीही काल मात्र अशा प्रकारचा कोणताच हादरा जाणवला नव्हता. .
लोकमत न्यूज नेटवर्क
पोत्रा : कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे ४ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास जुन्या जीर्ण चार घरांची मागच्या बाजूची भिंत जमीनदोस्त झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याच भागात गुढ आवाजासह हादरे बसत असल्याने तर्कवितर्क लढविले जात असले तरीही काल मात्र अशा प्रकारचा कोणताच हादरा जाणवला नव्हता. .
पोत्रा येथे रात्री १ वाजण्याच्या सुमारास नागरिक गाढ झोपेत असताना चार घरांच्या भिंती कोसळल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे गाढ झोपेत असलेले नागरिक जागे झाले. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. भिंती मागच्या बाजूने कलंडल्या. त्याामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घरे उद्ध्वस्त झाल्याने गोर- गरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत. घर कोसळून टिनपत्राचा आवाज आल्याने भूकंपाचाच हादरा झाला की काय? असे लोकांना वाटू लागल्याने पळापळ झाली. पोत्रा गावापासून सात कि.मी. अंतरावरील वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे परिसरात नेहमीच गुढ आवाज होऊन हादरे बसतात. त्यामुळे हा तोच प्रकार असल्याचा समज अनेकांना झाला. प्रत्यक्षात संबंधीत गावातील नागरिकांशी चर्चा केली असता वापटी, पांग्रा शिंदे येथे या क्षणी भुकंप झाला नसल्याचे नागरिकांकडून समजत आहे. मात्र घरांची पडझडीचे रहस्य अद्याप उलगडले नाही. पोत्रा येथील माधवराव ग्यानोजी गयाळ, शामराव कोंडबाराव बरगे, वसंतराव कोंडबाराव मुलगीर, लक्ष्मण माधवराव गयाळ यांची घरे जमीनदोस्त झाली. जवळील अनेक घरांना तडे गेले. रविवारी सुट्टी असल्याने प्रशासकीय यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी गावात आले नाही. तसेच ग्रामस्थांनीही कोणाशी संपर्क केला नसल्याचे सांगण्यात आले.